नवी दिल्ली वृत्तसंस्था
कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) ‘चलो संसद’ आंदोलनाने सोमवारी राजधानी दिल्लीत मोठे राजकीय वळण घेतले. एकीकडे संसदेकडे कूच करणाऱ्या हजारो आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असताना, दुसरीकडे CJP च्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची भेट घेऊन आंदोलनाशी संबंधित तीन प्रमुख मागण्या सरकारसमोर ठेवल्या. दरम्यान, जनपथ परिसरात आंदोलक आणि पोलिसांमध्ये तीव्र झडप उडाली. दगडफेक, अश्रुधूराचा मारा आणि लाठीचार्जामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून अनेक आंदोलक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
नड्डा यांच्याशी सविस्तर चर्चा
CJP चे राष्ट्रीय प्रवक्ते सौरभ दास आणि पक्षाचे नेते अशितोष रंका यांनी दुपारच्या सुमारास जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी जाऊन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. सुमारे काही काळ चाललेल्या बैठकीत त्यांनी सरकारसमोर आंदोलनाच्या प्रमुख मागण्या ठामपणे मांडल्या.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सौरभ दास म्हणाले, “आम्ही आमच्या सर्व मागण्या स्पष्टपणे मांडल्या आहेत. विशेषतः केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा किंवा त्यांना पदावरून हटवावे, ही आमची प्रमुख मागणी आहे. मंत्र्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले असून योग्य स्तरावर चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, अद्याप कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आमचे शांततापूर्ण आंदोलन सुरू राहील.”
CJP च्या तीन प्रमुख मागण्या
जेपी नड्डा यांच्यासमोर CJP ने पुढील तीन मागण्या ठेवल्या असल्याचे पक्षाने सांगितले आहे.
• पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची तात्काळ सुटका.
• केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना पदावरून हटवावे.
• आत्महत्या केलेल्या सर्व NEET उमेदवारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी.
CJP च्या म्हणण्यानुसार, जेपी नड्डा यांनी या मागण्या केंद्रीय नेतृत्वासमोर मांडण्याचे आणि त्यासाठी काही कालावधी देण्याची विनंती शिष्टमंडळाकडे केली आहे.
अभिजीत दीपके यांच्याबाबत खुलासा
आंदोलनादरम्यान CJP चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सुरुवातीला पक्षाकडून देण्यात आली होती. मात्र, काही वेळानंतर पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सौरभ दास यांनी याबाबत खुलासा करत, दीपके यांना ना ताब्यात घेण्यात आले, ना अटक करण्यात आली, असे स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या अटकेबाबत पसरलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
जनपथवर आंदोलन चिघळले
दरम्यान, संसदेकडे निघालेल्या आंदोलकांना जनपथ परिसरात रोखण्यात आल्यानंतर परिस्थिती अचानक बिघडली. आंदोलकांच्या एका गटाकडून दगडफेक करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या तसेच काही ठिकाणी लाठीचार्जही केला.
या संघर्षात अनेक आंदोलकांसह काही पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. परिसरात अतिरिक्त पोलीस दल, रॅपिड अॅक्शन फोर्स आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
दिल्लीत कडेकोट सुरक्षा
‘चलो संसद’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत यापूर्वीच हाय अलर्ट घोषित करण्यात आला होता. संसद भवन, जनपथ, इंडिया गेट आणि मध्य दिल्लीतील महत्त्वाच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. अनेक मार्गांवर वाहतुकीत बदल करण्यात आले असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
CJP ने आपल्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, केंद्र सरकारकडून अद्याप या मागण्यांवर अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे जेपी नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पुढे काय निर्णय होतो आणि आंदोलन कोणते वळण घेते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.


