डोंबिवली प्रतिनिधी
डोंबिवलीतील बांधकाम क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या एका गंभीर प्रकरणात जिल्हा परिषदेची कथित बनावट बांधकाम परवानगी, खोटे शिक्के आणि बनावट स्वाक्षऱ्यांच्या आधारे इमारत उभारून सदनिकांची विक्री करत नागरिकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिंदे गटाच्या शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांसह चौघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणानंतर शिंदे गटाशी संबंधित आणखी एक वादग्रस्त प्रकरण समोर आल्याने राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात शिंदे शिवसेनेचे कल्याण ग्रामीण उपतालुकाप्रमुख रामचंद्र गणपत माने, महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ, तसेच रामदास टेकाळे आणि मोहनलाल चौधरी यांच्याविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर आणि इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांनाही अटक करण्यात आली आहे.
प्रकरणातील फिर्यादी बळीराम पांडुरंग जाधव (व्यवसाय – रिक्षाचालक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१४ मध्ये सागाव-नांदिवली येथील ‘नंदा निवास’ चाळीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव रहिवाशांसमोर ठेवण्यात आला होता. संबंधित विकासकांनी सर्व आवश्यक शासकीय परवानग्या मिळाल्याचा दावा करत प्रत्येक रहिवाशाला ३५० चौरस फुटांचे घर देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेवून रहिवाशांनी पुनर्विकासाला संमती दिली.
मात्र, पुढे रहिवाशांना केवळ ३०० चौरस फुटांची सदनिका मिळणार असल्याचे सांगण्यात आले. त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळ हवे असल्यास स्वतंत्र रक्कम भरावी लागेल, अशी अट घालण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. फिर्यादीने वाढीव २६५ चौरस फुटांच्या बांधकामासाठी कर्ज काढून तब्बल १५ लाख रुपये संबंधितांकडे जमा केल्याचे नमूद केले आहे.
यानंतर ‘यशवंत पार्क’ ही इमारत अनधिकृत असल्याची माहिती समोर आल्यानंतर फिर्यादीने बांधकाम परवानगीची स्वतंत्र पडताळणी केली. त्यावेळी ऑगस्ट २००८ मधील जिल्हा परिषदेची दाखविण्यात आलेली बांधकाम परवानगी बनावट असल्याचे उघड झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तक्रारीनुसार, कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील बांधकामासाठी जिल्हा परिषदेच्या नावाने खोटी परवानगी तयार करण्यात आली. त्यासाठी बनावट शिक्के, कथित बनावट स्वाक्षऱ्या आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून इमारत अधिकृत असल्याचा आभास निर्माण करण्यात आला. या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली असून शासनाचीही दिशाभूल झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झाल्यानंतर चारही आरोपी काही दिवस फरार होते. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून मानपाडा पोलिसांनी त्यांना अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर पुढील तपासासाठी त्यांचा ताबा घेण्यात आला असून या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, बनावट कागदपत्रे तयार करण्यामागील सूत्रधार आणि इतर संबंधितांची भूमिकाही तपासली जात आहे.
रामचंद्र माने यांनी यापूर्वी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्यावर कल्याण ग्रामीण उपतालुकाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तर लक्ष्मण मिसाळ हे बांधकाम कामगार क्षेत्रातील महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे या अटकेमुळे राजकीय वर्तुळासह बांधकाम क्षेत्रातही मोठी चर्चा सुरू झाली आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास मानपाडा पोलीस करीत असून, बनावट कागदपत्रांच्या आधारे उभारण्यात आलेल्या इमारतींशी संबंधित आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.


