अहिल्यानगर प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात विवाहाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लग्नासाठी पाच लाख रुपये मोजल्यानंतर मोठ्या अपेक्षेने दोन सख्ख्या भावांनी संसाराची सुरुवात केली; मात्र अवघ्या पाच दिवसांतच त्यांच्या आयुष्याला मोठा धक्का बसला. नववधूंनी कुटुंबीयांच्या जेवणात गुंगीचं औषध मिसळून सर्वांना बेशुद्ध केलं आणि मध्यरात्री घरातून पलायन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून विवाहाच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या रॅकेटबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील चोराची वाडी येथील दोन सख्खे भाऊ मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने विवाह जुळवण्यात त्यांना अडचणी येत होत्या. याचाच फायदा घेत नांदेड येथील एका एजंटने छत्तीसगडमधील दोन तरुणींसोबत त्यांचा विवाह लावून देण्याचं आश्वासन दिलं. या बदल्यात एजंटने पाच लाख रुपयांची मागणी केली होती.
पीडित कुटुंबाने सुरुवातीला एक लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने एजंटच्या खात्यावर जमा केले. त्यानंतर २३ मे रोजी अत्यंत साध्या आणि वैदिक पद्धतीने दोन्ही विवाह पार पडले. विवाहानंतर उर्वरित चार लाख रुपये रोख स्वरूपात एजंटकडे सुपूर्द करण्यात आले. नववधू घरी आल्यानंतर सुरुवातीचे चार दिवस सर्व काही सुरळीत असल्याने कुटुंबीयांना कोणताही संशय आला नाही.
मात्र, पाचव्या दिवशी रात्री घडलेल्या प्रकाराने संपूर्ण कुटुंब हादरून गेलं. आरोपानुसार, दोन्ही नववधूंनी रात्रीच्या जेवणात गुंगीचं औषध मिसळलं. जेवण केल्यानंतर घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत गेल्याची संधी साधून दोघींनी घरातून पलायन केलं. सकाळी जाग आल्यानंतर नववधू घरात नसल्याचं दिसून आलं. त्यानंतर एजंटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्याचाही संपर्क होत नसल्याने आपली मोठी फसवणूक झाल्याची जाणीव कुटुंबीयांना झाली.
या घटनेनंतर पीडितांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात धाव घेत न्यायाची मागणी केली. मात्र, वारंवार पोलीस ठाण्यात जाऊनही अद्याप गुन्हा नोंदवण्यात आलेला नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे आर्थिक फसवणुकीबरोबरच मानसिक धक्का बसलेल्या या कुटुंबाची चिंता अधिक वाढली आहे.
दरम्यान, श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, “चोराची वाडी येथील दोन भावांची विवाहाच्या आमिषाने फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असून, आवश्यक पुरावे संकलित करून गुन्हा दाखल केला जाईल. यामागे संघटित टोळी कार्यरत आहे का, याचाही तपास करण्यात येणार आहे,” अशी माहिती दिली.
अलिकडच्या काळात विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढत असल्याचं दिसून येत आहे. विशेषतः इतर राज्यांतील मुलींसोबत लग्न लावून देण्याचं आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अशा एजंटांमार्फत विवाह ठरवताना त्यांची संपूर्ण पडताळणी करणे, संबंधित व्यक्तींची कागदपत्रे तपासणे आणि व्यवहाराची अधिकृत नोंद ठेवणे आवश्यक असल्याचंही जाणकारांनी सांगितलं आहे.
या धक्कादायक घटनेमुळे श्रीगोंदा तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, फसवणूक करणाऱ्या एजंटसह फरार झालेल्या दोन्ही महिलांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर उभं राहिलं आहे.


