सातारा प्रतिनिधी
आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत २४ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून, आणखी १६ जणांविरोधातील तडीपारीचे प्रस्ताव विचाराधीन आहेत. पालखी मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्ह्यात दोन हजारांहून अधिक पोलीस, होमगार्ड आणि विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा बुधवारी (१५ जुलै) सातारा जिल्ह्यात दाखल होत असून, या सोहळ्यात राज्यभरातून लाखो वारकरी सहभागी होणार आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. संभाव्य गुन्हेगारांवर आधीच प्रतिबंधात्मक कारवाई करत सराईत गुन्हेगारांना जिल्ह्याबाहेर तडीपार करण्यात आले आहे.
पालखी मार्गावर गर्दीचा गैरफायदा घेऊन पाकीटमारी, चोरी, महिलांची छेडछाड किंवा इतर गुन्हे घडू नयेत यासाठी साध्या वेशातील डीबी पथके २४ तास गस्त घालणार आहेत. संवेदनशील ठिकाणांवर विशेष नजर ठेवण्यात येणार असून, प्रत्येक हालचालीवर पोलीस नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवले जाणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील ६३ पोलीस अधिकारी, ८३६ पोलीस अंमलदार, १,३०० होमगार्ड आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी ७५ पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय कोल्हापूर, सांगली आणि रायगड जिल्ह्यांतून १८ अधिकारी व २९० अंमलदारांचे अतिरिक्त पोलीस बळ मागवण्यात आले आहे. राज्य राखीव पोलीस दलाची (एसआरपीएफ) एक तुकडीही बंदोबस्तात सहभागी होणार आहे.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देता यावा यासाठी दंगल नियंत्रण पथक (RCP) आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवण्यात आले आहे. पालखी मार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढविण्यात आली असून, वाहतुकीचे नियोजनही स्वतंत्रपणे करण्यात आले आहे.
या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेवर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार वर्मा, सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर हे थेट लक्ष ठेवून आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या असून, गर्दीचा गैरफायदा घेणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पालखी सोहळा शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडावा, यासाठी वारकरी, स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल, संशयित व्यक्ती अथवा बेवारस वस्तू आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस कर्मचाऱ्यांना किंवा नियंत्रण कक्षाला माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
यंदाच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसह वाहतूक नियंत्रण, गुन्हे प्रतिबंध आणि आपत्कालीन प्रतिसाद यावर विशेष भर देण्यात आल्याने सातारा पोलीस प्रशासनाने सर्वंकष आणि बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारल्याचे चित्र दिसून येत आहे.


