अहिल्यानगर प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात जुन्या राजकीय वैमनस्यातून घडलेल्या एका अत्यंत भीषण हल्ल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. तब्बल पाच वर्षांपासून सुरू असलेल्या वादाचा सूड उगवण्यासाठी सहा जणांनी एका व्यक्तीवर तलवारीने जीवघेणा हल्ला करत त्यांचे दोन्ही हातांचे पंजे मनगटापासून छाटल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली. या रक्तरंजित हल्ल्यामुळे श्रीगोंदा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर इतर पाच जणांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिदास हरिश्चंद्र दांगडे (वय ४८) हे शनिवारी सायंकाळी आपल्या दुचाकीवरून घुगल वडगाव येथील घरी जात होते. सुपेकर वस्ती परिसरात दबा धरून बसलेल्या सहा हल्लेखोरांनी त्यांना अडवून अचानक तलवारीने हल्ला चढवला. जीव वाचवण्यासाठी रोहिदास दांगडे यांनी जवळच्या एका घरात धाव घेतली. मात्र, हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत थेट घरात प्रवेश केला आणि त्यांच्यावर सपासप तलवारीचे वार केले.
हल्ल्याची क्रूरता इतकी होती की, आरोपींनी रोहिदास दांगडे यांच्या दोन्ही हातांवर वार करत मनगटापासून दोन्ही पंजे वेगळे केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दांगडे यांना पाहून घरातील महिलेला प्रचंड धक्का बसला आणि ती बेशुद्ध झाली. परिसरातील नागरिकांनी तातडीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
प्राथमिक तपासात हा हल्ला जुन्या राजकीय वैरातून झाल्याचे समोर आले आहे. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या वादाचा बदला घेण्यासाठी हा कट रचल्याचा आरोप पीडितांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणी रोहिदास दांगडे यांची मुलगी राधिका दांगडे हिने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी परशुराम दांगडे, अभयराज दांगडे, सागर दांगडे, दत्तात्रय दांगडे, विक्रम दांगडे आणि संग्राम पवार या सहा जणांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी विक्रम तुळशीराम दांगडे याला अटक केली आहे. उर्वरित पाच आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
या अमानुष हल्ल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, राजकीय वैमनस्यातून वाढत चाललेल्या हिंसक घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला असून, फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


