मुंबई प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघणाऱ्या लाखो भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) यंदा मोठी वाहतूक व्यवस्था उभारली आहे. राज्यभरातून तब्बल ५,५०० विशेष एसटी बस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि नियोजनबद्ध व्हावा यासाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे. महिलांना ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत ५० टक्के भाडे सवलत, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या विशेष नियोजनाची माहिती देताना सांगितले की, आषाढी वारीदरम्यान लाखो भाविक पंढरपूरला येत असल्याने एसटी महामंडळाने यंदा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी अतिरिक्त बस, कर्मचारी आणि सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन केले आहे.
४० भाविकांचा गट असेल तर गावातून थेट पंढरपूरला बस
यंदाच्या नियोजनातील महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील कोणत्याही गावातील ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांचा गट असल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी संबंधित भाविकांनी त्यांच्या जवळच्या एसटी आगारात किंवा डेपोमध्ये आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वारकऱ्यांनाही थेट पंढरपूरपर्यंत प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे.
महिलांना ५० टक्के सवलत, ज्येष्ठांना मोफत प्रवास
या विशेष बस सेवांवर राज्य शासनाच्या सर्व प्रवासी सवलती लागू राहणार आहेत. महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना ५० टक्के भाडे सवलत मिळणार असून, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ भाविकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
पंढरपूर परिसरात विशेष व्यवस्था
वारीदरम्यान होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पंढरपूर आणि परिसरात अतिरिक्त बसथांबे, स्वतंत्र वाहतूक नियंत्रण व्यवस्था, सुरक्षा कर्मचारी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आषाढी एकादशीनंतर परतीच्या प्रवासातही भाविकांना अडचणी येऊ नयेत यासाठी प्रत्येक प्रमुख मार्गावर स्वतंत्र रांगा, बसचे नियोजन आणि वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या कामासाठी ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
१३ हजार एसटी कर्मचाऱ्यांसाठी विशेष भोजन व्यवस्था
यात्रेदरम्यान चोवीस तास सेवा बजावणाऱ्या सुमारे १३ हजार एसटी चालक, वाहक, तांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांसाठी यंदाही विशेष भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून या कर्मचाऱ्यांना चहा, नाश्ता आणि जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सलग सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले.
भाविकांना वेळेत नोंदणीचे आवाहन
एसटी महामंडळाने वारकऱ्यांना आणि भाविकांना विशेष बस सेवेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या एसटी डेपोमध्ये वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. आषाढी वारीदरम्यान वाढणारी प्रवाशांची संख्या लक्षात घेता आगाऊ नियोजन केल्यास प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल, असेही महामंडळाने म्हटले आहे.
यंदाच्या आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांची गर्दी अपेक्षित असून, राज्य सरकार आणि एसटी महामंडळाने केलेल्या या व्यापक नियोजनामुळे भाविकांचा पंढरपूरचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि सुखकर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


