मुंबई प्रतिनिधी
राज्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डासजन्य आजारांचा धोका कायम असतानाच आर्थिक राजधानी मुंबई पुन्हा एकदा डेंगीच्या विळख्यात सापडल्याचे चित्र समोर आले आहे. राज्याच्या राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या ताज्या अहवालानुसार, १ जानेवारी ते ७ जुलै २०२६ या कालावधीत मुंबईत डेंगीचे तब्बल ८४७ रुग्ण आढळले असून राज्यातील कोणत्याही महापालिका क्षेत्रातील ही सर्वाधिक नोंद आहे. राज्यातील एकूण डेंगी रुग्णांपैकी जवळपास २७ टक्के रुग्ण एकट्या मुंबईतील असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
दिलासादायक बाब म्हणजे, डेंगी, मलेरिया आणि चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत गेल्या वर्षाच्या तुलनेत घट झाली असली, तरी पावसाळ्यात डासांची वाढती उत्पत्ती लक्षात घेता आगामी काही आठवडे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
राज्यभरात यंदा ७ जुलैपर्यंत डेंगीचे ३ हजार ११५ रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबईचा वाटा सर्वाधिक आहे. मुंबईनंतर पुणे महापालिका क्षेत्रात ३५४, ठाणे महापालिकेत १६३, तर कल्याण आणि पनवेलमध्ये प्रत्येकी ५५ डेंगी रुग्णांची नोंद झाली आहे.
मलेरियातही मुंबई अव्वल
डेंगीप्रमाणेच मलेरियामध्येही मुंबईची परिस्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. मुंबईत मलेरियाचे ३ हजार ४९८ रुग्ण आढळले असून, राज्यातील महापालिका क्षेत्रांमध्ये ही सर्वाधिक संख्या आहे. यापैकी ५७५ रुग्ण प्लास्मोडियम फॅल्सिपरम या गंभीर प्रकारचे आहेत. तसेच १८७ रुग्ण हे बाहेरून मुंबईत आलेले असल्याची नोंद करण्यात आली आहे.
याशिवाय, मुंबईत चिकुनगुनियाचे २८ रुग्णही आढळले आहेत. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे या तिन्ही आजारांमुळे मुंबईत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
आरोग्य विभागाची मोहीम अधिक तीव्र
पावसाळ्यात डासांची पैदास झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक व्यापक केल्या आहेत. तापाच्या रुग्णांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण, संशयितांची तातडीने तपासणी, डासांच्या उत्पत्तीस्थळांचा शोध, अळीनाशक फवारणी, जलसाठ्यांमध्ये गप्पी मासे सोडणे आणि जनजागृती मोहिमा मोठ्या प्रमाणात राबविल्या जात आहेत.
मुंबईतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सहकार्याने वैद्यकीय अधिकारी आणि कीटकशास्त्र विभागातील अधिकाऱ्यांना मलेरिया नियंत्रणासाठी विशेष प्रशिक्षणही दिले जात आहे. जलद निदान आणि तातडीच्या उपचारांवर भर देण्यात येत असून प्रत्येक जिल्ह्यात जलद प्रतिसाद पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
राज्यभर निरीक्षण केंद्रांचे जाळे
मलेरिया आणि डेंगीचा प्रादुर्भाव वेळीच ओळखण्यासाठी राज्यभरात विशेष यंत्रणा कार्यरत आहे. मलेरिया निदानासाठी ८९ निरीक्षण केंद्रे, तर डेंगी आणि चिकुनगुनियासाठी ५० निरीक्षण केंद्रे सुरू आहेत. मुंबई आणि गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
जुलै महिना ‘डेंग्यू प्रतिबंध महिना’
आरोग्य विभागाने जुलै महिन्याला ‘डेंग्यू प्रतिबंध महिना’ म्हणून घोषित केले असून, विविध शासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती सुरू आहे. नागरिकांनी घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, पाण्याच्या टाक्या, कुलर आणि फुलदाण्या आठवड्यातून एकदा स्वच्छ करणे, पूर्ण अंग झाकणारे कपडे परिधान करणे आणि ताप, अंगदुखी, डोकेदुखी किंवा अशक्तपणाची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या उपाययोजना
तापाच्या रुग्णांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण व तातडीने तपासणी.
मलेरिया निदानासाठी ८९, तर डेंगी-चिकुनगुनियासाठी ५० निरीक्षण केंद्रे कार्यरत.
डासांची उत्पत्तीस्थळे शोधून अळीनाशक फवारणी आणि गप्पी मासे सोडण्याची मोहीम.
प्रत्येक जिल्ह्यात जलद प्रतिसाद पथके सज्ज.
मुंबई व गडचिरोलीमध्ये मलेरिया नियंत्रणासाठी विशेष अभियान.
आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण.
जुलै महिन्यात राज्यभर ‘डेंग्यू प्रतिबंध महिना’ अंतर्गत जनजागृती मोहीम.
नागरिकांनी पाणी साचू न देणे आणि ताप आल्यास त्वरित तपासणी करून घेण्याचे आवाहन.
पावसाळ्यात डासजन्य आजारांचा धोका वाढत असताना प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन आणि वेळेत उपचार हेच डेंगी, मलेरिया आणि चिकुनगुनियावर प्रभावी नियंत्रणाचे सर्वात महत्त्वाचे साधन असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.


