सातारा प्रतिनिधी
कऱ्हाड तालुक्यातील आगाशिव डोंगरावर वृक्षारोपण आणि सीडबॉल प्रत्यारोपण मोहिमेसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाश्यांच्या थव्याने अचानक हल्ला केल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेत सुमारे ४० विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर कऱ्हाड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, आगाशिवनगर परिसरातील एका शाळेचे सुमारे ५० विद्यार्थी शिक्षकांसमवेत आगाशिव डोंगरावर पर्यावरण संवर्धन उपक्रमांतर्गत सीडबॉल प्रत्यारोपण आणि वृक्षारोपणासाठी गेले होते. विद्यार्थी उत्साहात वृक्षारोपणाचे काम करत असतानाच अचानक मधमाश्यांचा थवा त्यांच्या दिशेने आला आणि काही क्षणांतच विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मधमाश्यांच्या दंशामुळे विद्यार्थी आरडाओरडा करत सैरावैरा पळू लागले. अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, हातांवर आणि शरीराच्या विविध भागांवर मधमाश्यांनी दंश केला. जीव वाचवण्यासाठी धावताना काही विद्यार्थी डोंगर उतरताना घसरून पडले, त्यामुळे त्यांना किरकोळ दुखापतही झाली.
घटनेनंतर शिक्षकांनी तत्काळ प्रसंगावधान राखत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने वाहनांच्या मदतीने कऱ्हाड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले. मधमाश्यांच्या दंशामुळे काही विद्यार्थ्यांना सूज आणि वेदना होत होत्या; मात्र वेळेत उपचार मिळाल्याने कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवली नाही.
घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी रुग्णालयात धाव घेतली. आपल्या पाल्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. उपचारानंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती समाधानकारक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांना आवश्यक सूचना देऊन पालकांच्या ताब्यात घरी पाठविण्यात आले.
या घटनेमुळे पर्यावरण संवर्धनासाठी आयोजित करण्यात आलेली मोहीम काही काळासाठी थरारक ठरली. अशा दुर्गम भागात विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यापूर्वी परिसरातील संभाव्य नैसर्गिक धोक्यांचा आढावा घेणे, मधमाश्यांची पोळी अथवा वन्यजीवांचा वावर याची खातरजमा करणे आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक वैद्यकीय तयारी ठेवणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले असून भविष्यात अशा उपक्रमांचे नियोजन अधिक दक्षतेने करण्याची मागणीही करण्यात येत आहे.


