मुंबई प्रतिनिधी
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला थेट धमकावणारी आणि लोकप्रतिनिधीच्या पदाला न शोभणारी घटना बुधवारी मुंबईत घडली. शिवसेना (शिंदे गट) खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना संतापाच्या भरात केवळ शिवीगाळच केली नाही, तर “परत आलात तर मारून पाठवेन” अशी थेट धमकीही दिली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून माध्यम स्वातंत्र्य आणि लोकप्रतिनिधींच्या वर्तनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून संजय दिना पाटील हे त्यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी एका कार्यक्रमात “माझ्या नादाला लागू नका, मी पाच लोकांना ठार मारलंय” असे वादग्रस्त विधान केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी संयम गमावत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
“मी विसरून जाईन की मी खासदार आहे”
प्रारंभी काही मिनिटे पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर पाटील यांचा पारा अचानक चढला. पत्रकारांकडून सातत्याने प्रश्न विचारले जात असल्याने ते संतप्त झाल्याचे दिसून आले. “मी तुमच्याशी दोन मिनिटं बोललो ना? आता तुम्ही अति करताय. बंद करा आता. नाहीतर मी विसरून जाईन की मी खासदार आहे,” असे म्हणत त्यांनी पत्रकारांवर संताप व्यक्त केला.
यानंतर त्यांनी आणखी आक्रमक भूमिका घेत, “इज्जत करतोय, इज्जत करा. उगाच माझ्या डोक्यात जाऊ नका. हे रेकॉर्ड करा. आयुक्तांना दाखवा. पण आता पुन्हा माझ्याकडे आलात तर मारून पाठवेन,” अशा शब्दांत धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पत्रकारांच्या आईवरूनही अश्लील शिवीगाळ केल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे.
“रेकॉर्ड करा, तक्रार करा”
विशेष म्हणजे, आपल्या वक्तव्यांची नोंद होत असल्याची पूर्ण जाणीव असतानाही पाटील यांनी धमकीची भाषा कायम ठेवली. “जे बोलतोय ते रेकॉर्ड करा. आयुक्तांकडे तक्रार करा. पोलिसांसमोर सांगतोय. आता माझ्याकडे प्रश्न विचारायला आलात तर मार खाणार. काय करायचं ते करा,” असे आव्हानात्मक वक्तव्य त्यांनी केले.
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून पत्रकार संघटना, विरोधी पक्ष आणि नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
चार दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश, त्यानंतर वादांची मालिका
संजय दिना पाटील यांनी नुकताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षांतरानंतर अवघ्या काही दिवसांतच ते सलग वादांच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
दोन दिवसांपूर्वी एका आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी “माझ्या नादाला लागू नका. मी आधी पाच लोकांना ठार मारलंय. आंदोलन केलंत तर घरात घुसून बॉम्ब टाकेन,” असे कथित वक्तव्य केल्याचा आरोप झाला होता. या विधानामुळे आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना आता पत्रकारांना दिलेल्या धमकीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
संजय राऊत आक्रमक; पोलीस आयुक्तांना पत्र
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
पत्रात राऊत यांनी नमूद केले आहे की, लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारची भाषा आणि हिंसक धमक्या देणे अत्यंत गंभीर बाब आहे. जर पोलिसांनी स्वतःहून कारवाई केली नाही, तर न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
माध्यम स्वातंत्र्यावर हल्ला?
पत्रकार संघटनांनीही या घटनेचा निषेध केला आहे. लोकशाहीत पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असून, त्यांना धमकावणे किंवा शिवीगाळ करणे हे असंवैधानिक असल्याचे मत अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी व्यक्त केले. सत्ताधारी पक्षाच्या खासदाराकडून अशा प्रकारचे वर्तन होत असल्याने माध्यम स्वातंत्र्य धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
कारवाई होणार का?
संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यांमुळे केवळ राजकीय वाद निर्माण झालेला नाही, तर कायद्याच्या चौकटीतही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सार्वजनिकरित्या धमकी देणे, पत्रकारांना मारहाणीची भाषा वापरणे आणि हिंसाचाराचे समर्थन केल्यासारखी विधाने करणे यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
आता मुंबई पोलीस या प्रकरणाची दखल घेणार का, पत्रकारांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल होणार का आणि शिंदेसेना पक्ष आपल्या खासदाराच्या वक्तव्यांवर कोणती भूमिका घेणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
लोकशाही व्यवस्थेत जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदाराकडून अपेक्षित असते ती संयमित भाषा, उत्तरदायित्व आणि सभ्यता. मात्र, संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यांमुळे या अपेक्षांनाच तडा गेल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.


