मुंबई प्रतिनिधी
राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे, इटरीज तसेच अन्न प्रक्रिया करणाऱ्या सर्व आस्थापनांसाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने कठोर अन्नसुरक्षा आणि स्वच्छता नियम लागू करण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेअंतर्गत अनेक महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले असून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कोणतीही तडजोड न करता कारवाई करण्यात येईल. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जी सहन केली जाणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्राहकांना मोफत आणि सुरक्षित पाणी देणे अनिवार्य
नवीन निर्देशांनुसार राज्यातील सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना ग्राहकांसाठी मोफत, स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचा स्पष्ट सूचना फलक आस्थापनांच्या दर्शनी भागात किंवा ग्राहकांना सहज दिसेल अशा ठिकाणी लावणे आवश्यक राहणार आहे.
एफडीएच्या सूचनांनुसार ग्राहकाने स्वतःहून बाटलीबंद पाण्याची मागणी केल्यास त्यासाठी शुल्क आकारता येईल. मात्र, ग्राहकाला मोफत सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणे ही संबंधित आस्थापनाची जबाबदारी असेल. याशिवाय ग्राहकांसाठी हँडवॉश, साबण, स्वच्छ टॉवेल तसेच मूलभूत स्वच्छताविषयक सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
किचनसाठीही कठोर निकष
अन्न तयार करण्याच्या आणि साठवणुकीच्या प्रक्रियेत स्वच्छता राखण्यासाठी एफडीएने किचनसंदर्भातही काही स्पष्ट निकष निश्चित केले आहेत. किचनमधील भिंती आणि फ्लोअर वॉशेबल टाइल्सचे असावेत, पाणी झिरपणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच पुरेशी हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायुवीजन आणि एक्झॉस्ट यंत्रणा असणे आवश्यक राहणार आहे.
तसेच कच्चा माल, शिजवलेले अन्न, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ यांच्यासाठी स्वतंत्र साठवण व्यवस्था ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ नये यासाठी किचन परिसर किडेमुक्त ठेवण्यावरही भर देण्यात आला आहे.
झुरळे, उंदीर आणि किडेमुक्त वातावरण आवश्यक
एफडीएच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक आस्थापनाने नियमित पेस्ट कंट्रोल करणे आवश्यक राहणार आहे. इलेक्ट्रॉनिक फ्लाय फ्लॅप्स, कीटकनाशक यंत्रणा आणि स्वच्छता व्यवस्थेद्वारे झुरळे, पाल, माशा आणि उंदरांपासून मुक्त वातावरण राखावे लागणार आहे.
अन्नपदार्थ तयार होणाऱ्या किंवा साठविल्या जाणाऱ्या परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा अथवा दूषित वातावरण आढळल्यास संबंधित आस्थापनाविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
तपासण्यांमध्ये गंभीर त्रुटी उघड
राज्यभर अलीकडे करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचे मुंढे यांनी सांगितले. अनेक ठिकाणी अस्वच्छ वातावरणात अन्न तयार केले जात असल्याचे आढळले. याशिवाय वारंवार वापरलेल्या खाद्यतेलाचा वापर, निकृष्ट दर्जाचे पॅकेजिंग साहित्य, अन्न साठवणुकीतील निष्काळजीपणा आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन अशा गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या.
या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अन्नसुरक्षा मानके, नोंदणी, परवाने आणि स्वच्छतेसंबंधी सर्व नियमांचे पालन करणे आता अत्यावश्यक करण्यात आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पावसाळी अधिवेशनातही चर्चा
दरम्यान, एफडीएच्या कारवाईच्या धडाक्याची चर्चा राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही झाली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत बोलताना तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांनी तब्बल २५० कोटी रुपयांचे लॉबिंग केल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपांबाबत माध्यमांनी विचारणा केली असता, अशा कोणत्याही बाबीची माहिती नसल्याचे सांगत मुंढे यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.
खाद्य व्यवसायांसमोर नवे आव्हान
एकीकडे भेसळयुक्त, निकृष्ट आणि असुरक्षित अन्नपदार्थांविरोधात एफडीएने राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे, तर दुसरीकडे हॉटेल्स आणि खाद्य व्यवसायांसाठी स्वच्छता व अन्नसुरक्षेचे निकष अधिक कठोर करण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात राज्यातील सर्व खाद्य व्यावसायिकांना अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार असून ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये अधिक जबाबदारीने काम करावे लागणार आहे.
अन्नसुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकार आणि एफडीएची ही मोहीम महत्त्वाची मानली जात असून, यामुळे ग्राहकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


