मुंबई प्रतिनिधी
राज्य शासनाने मंगळवारी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील बदल्यांचे आदेश जारी करत प्रशासकीय पातळीवर महत्त्वपूर्ण फेरबदल केले. या फेरबदलांमध्ये एकूण १४ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांचा समावेश असून, त्यातील सर्वाधिक चर्चेची बदली म्हणजे ज्येष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांची नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदी करण्यात आलेली नियुक्ती होय.
राज्याच्या उपराजधानीत कायदा व सुव्यवस्था, वाढते सायबर गुन्हे, संघटित गुन्हेगारी आणि शहरी सुरक्षेची आव्हाने लक्षात घेता नागपूर पोलीस दलाच्या नेतृत्वाची जबाबदारी आता नांगरे-पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यापूर्वी ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अपर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा आणि कठोर प्रतिमेचा लाभ नागपूर शहराला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नांगरे-पाटील यांच्या बदलीनंतर त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची अपर पोलीस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महिला अधिकारी अर्चना त्यागी यांना न्यायिक व तांत्रिक विभागाच्या पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या विभागात तांत्रिक आधुनिकीकरण, डिजिटल तपास आणि न्यायालयीन समन्वयाची महत्त्वाची जबाबदारी असते.
दरम्यान, या पदावर कार्यरत असलेले संजय वर्मा यांची महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवास, कल्याणकारी योजना आणि पायाभूत सुविधांच्या विकासाची जबाबदारी त्यांच्याकडे राहणार आहे.
राज्यातील पोलीस दलातील पदोन्नतीच्या प्रक्रियेलाही या फेरबदलांमुळे गती मिळाली आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले दत्तात्रय शिंदे यांना पदोन्नती देत पुण्यातील राज्य गुन्हे अभिलेख ब्युरोच्या पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी सायबर विभागातील उप पोलीस महानिरीक्षक संजय शिंत्रे यांची मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच, अभिनश कुमार यांच्याकडे पुणे शहराच्या पोलीस आयुक्तपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. राज्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि संवेदनशील शहरांपैकी एक असलेल्या पुण्यातील कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्यावर असेल.
याशिवाय शशिकांत सातव यांची छत्रपती संभाजीनगरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर शहरात पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असलेल्या सातव यांना पदोन्नतीसह ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. अमरावती येथून रमेश धुमाळ यांची नागपूर शहरात पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
जिल्हास्तरीय बदल्यांमध्ये नीलाभ रोहन यांची नांदेडचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून श्रेणिक लोढा यांच्याकडे हिंगोली जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रांजली सोनावणे यांची अमरावती शहराच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून, पियुष जगताप यांना खामगाव येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून पाठविण्यात आले आहे.
याचबरोबर प्रशांत मोहिते यांची नवी मुंबईतील डायल-११२ आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेत पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डायल-११२ ही राज्यातील आपत्कालीन सेवा व्यवस्थेची महत्त्वाची कडी मानली जाते. तर रूपाली अंबुरे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच नारायण शिरगावकर यांची अहिल्यानगर जिल्ह्यातील कुसळगाव येथील राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) गट क्रमांक १९ चे समादेशक (कमांडंट) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या या व्यापक फेरबदलांकडे आगामी काळातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने उचललेले महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. विशेषतः नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि हिंगोलीसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून पोलीस प्रशासन अधिक परिणामकारक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या बदल्यांमुळे राज्यातील पोलीस यंत्रणेत नव्या जबाबदाऱ्यांचे वाटप होऊन प्रशासकीय कार्यक्षमतेला चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे.


