मुंबई प्रतिनिधी
मुंबई : बीकेसी येथील मेट्रो-३च्या एक्वा लाईन स्टेशनच्या बेसमेंटमध्ये आज मंगळवारी सकाळी विषारी घोणस साप आढळल्याने काही काळ कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. मात्र, सर्पमित्रांच्या तत्परतेने सापाला सुरक्षितपणे पकडून वन विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२३ जून) सकाळी ७.४७ वाजता एमएसएफ सिक्युरिटीकडून ‘वापरा’ संस्थेला फोन करून बीकेसी येथील मेट्रो-३च्या एक्वा लाईन स्टेशनलगत असलेल्या ऑडिट भवनाशेजारील बेसमेंट-२मध्ये साप आढळल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर सर्पमित्रांची मदत मागविण्यात आली.
घटनेची माहिती तत्काळ मुंबई रेंजचे वनरक्षक तथा राऊंड अधिकारी दीपक गायकवाड आणि मुंबई रेंज नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर सर्पमित्र अतुल कांबळे घटनास्थळी दाखल झाले.
पाहणीदरम्यान संबंधित साप हा भारतातील अत्यंत विषारी सापांपैकी एक असलेला घोणस असल्याचे निदर्शनास आले. सुमारे दोन ते अडीच फूट लांबीचा हा साप भिंतीच्या कोपऱ्यात अशक्त अवस्थेत बसलेला होता. दीर्घकाळ उष्णतेमुळे तो निर्जलीकरण झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
सर्पमित्रांनी कर्मचाऱ्यांकडून पिण्याचे पाणी मागवून सापाला काळजीपूर्वक पाणी पाजले. पाणी प्यायल्यानंतर सापामध्ये पुन्हा हालचाल सुरू झाली. त्यानंतर आवश्यक खबरदारी घेत सापाला सुरक्षितपणे पकडण्यात आले.
रेस्क्यूनंतर उपस्थित कर्मचाऱ्यांना सापांविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच साप आढळल्यास घाबरून न जाता सुरक्षित अंतर ठेवावे, स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नये आणि तातडीने सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
यानंतर घोणस सापाला वन विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या सोडण्यात आले.
पावसाळ्यात साप बाहेर येण्याची शक्यता वाढते
पावसाळ्यात सापांच्या बिळांमध्ये पाणी शिरल्याने ते बाहेर येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या परिसरात साप किंवा इतर वन्यजीव आढळल्यास घाबरून न जाता तातडीने सर्पमित्र किंवा वन विभागाच्या १९२६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.


