मुंबई प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घडामोडींवरून ठाकरे आणि शिंदे गटामध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली. पक्षफोडीच्या राजकारणावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मतदारांच्या विश्वासाचा अवमान होत असल्याची खंत व्यक्त केली.
मुंबईत आयोजित कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. राज्यासमोर दुष्काळ, पावसाची अनिश्चितता, बेरोजगारी आणि विकासाचे प्रश्न उभे असताना राजकीय पक्ष मात्र खासदार, आमदार आणि नगरसेवक फोडण्याच्या राजकारणात गुंतल्याची टीका त्यांनी केली.
“संपूर्ण देशाचा विचका झाला आहे, राज्याचाही विचका झाला आहे. महाराष्ट्राचे किती नुकसान होत आहे याचा कोणी विचार करत नाही. आज पावसाचा पत्ता नाही, दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे; पण आपल्या राजकारणात काय सुरू आहे? खासदार फोडा, आमदार फोडा, नगरसेवक फोडा. सत्ता टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याची तयारी दाखवली जात आहे. माणसे विकली जात आहेत, ही अत्यंत चिंतेची बाब आहे,” असे राज ठाकरे म्हणाले.
‘मतदारांनी आता प्रश्न विचारला पाहिजे’
राज ठाकरे यांनी यावेळी थेट मतदारांनाच आवाहन केले. निवडणुकीच्या वेळी तासन्तास रांगेत उभे राहून मतदान करणाऱ्या जनतेचा विश्वास काही लोक पैशांसाठी तुडवत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“ज्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही उन्हात चार-पाच तास रांगेत उभे राहता, तोच लोकप्रतिनिधी नंतर ५० किंवा १०० कोटी रुपयांसाठी पक्ष बदलत असेल, तर मतदारांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. असे लोक पुन्हा मतांसाठी तुमच्याकडे आले, तर तुम्ही त्यांना पुन्हा निवडून देणार आहात का? लोकशाहीत अंतिम निर्णय जनतेचाच असतो,” असे ते म्हणाले.
‘स्वाभिमान संपला की जिवंत प्रेतं उरतात’
राजकीय निष्ठा आणि स्वाभिमान या मुद्द्यांवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी कठोर शब्दांत टीका केली. “एक जुने वाक्य आहे, स्वाभिमान मेला की उरतात फक्त जिवंत प्रेतं. सध्या महाराष्ट्रात आणि देशात ज्या प्रकारचे राजकारण सुरू आहे, त्यातून पुढच्या पिढ्यांना आपण काय संदेश देत आहोत? आम्ही विकले गेलो, एवढेच का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘मतांच्या किमतीपेक्षा सत्तेची गणिते महत्त्वाची’
देशासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे असतानाही राजकीय पक्ष सत्तेसाठी लोकप्रतिनिधी फोडण्याच्या राजकारणात व्यस्त असल्याचा आरोप करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“आज मतदारांच्या मतांची किंमत शून्य केली जात आहे. नागरिकांनी मतदान करायचे, प्रतिनिधी निवडून द्यायचे आणि नंतर तेच प्रतिनिधी पैशांच्या किंवा सत्तेच्या समीकरणांच्या आधारे पक्ष बदलणार असतील, तर ही लोकशाहीची शोकांतिका आहे. आज हे एका पक्षाकडून होत आहे, उद्या दुसरा पक्ष तेच करेल. मग याला खरी निवडणूक म्हणायची का?” असा सवाल त्यांनी केला.
‘आपले खासदार निवडून आले नाहीत, हेच बरे झाले’
या संपूर्ण घडामोडींवर उपरोधिक टिप्पणी करताना राज ठाकरे म्हणाले, “काल मी बसलो असताना मनात आले की, बरे झाले आपले खासदार निवडून आले नाहीत. निदान त्यांना फोडण्याचा प्रश्न तरी निर्माण झाला नसता.” त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
दरम्यान, ठाकरे गटातील सहा खासदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पुढील राजकीय घडामोडींच्या दृष्टीने या प्रकरणाकडे विशेष लक्ष लागले आहे.


