मुंबई प्रतिनिधी
कौटुंबिक वाद, मानसिक तणाव, छळ, अत्याचार, कायदेशीर अडचणी किंवा सुरक्षेबाबतची चिंता अशा कोणत्याही संकटाच्या प्रसंगी महिलांना तातडीने मदत मिळावी यासाठी राज्य शासनाने ‘मिशन शक्ती’ अभियानांतर्गत १८१ महिला हेल्पलाइन सेवा अधिक प्रभावीपणे कार्यान्वित केली आहे. महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून चालविण्यात येणारी ही सेवा राज्यातील महिलांसाठी संकटसमयी महत्त्वाचा आधार ठरत असून, २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध आहे.
महिलांना सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि भयमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या ‘मिशन शक्ती’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत ही सेवा सुरू करण्यात आली आहे. महिलांना आवश्यक असलेली माहिती, मार्गदर्शन, समुपदेशन आणि तातडीचे सहाय्य एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
संकटात धावून येणारी यंत्रणा
राज्यातील अनेक महिलांना कौटुंबिक कलह, घरगुती हिंसाचार, हुंडाबळी, मानसिक छळ, धमक्या किंवा इतर सामाजिक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा अशा परिस्थितीत मदतीसाठी कुठे संपर्क साधावा, याबाबत महिलांना पुरेशी माहिती नसते. अशा वेळी १८१ महिला हेल्पलाइन महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
या हेल्पलाइनवर संपर्क साधल्यानंतर संबंधित महिलेची समस्या समजून घेतली जाते आणि त्यानुसार आवश्यक ती मदत पुरवली जाते. परिस्थितीनुसार पोलीस, कायदेशीर यंत्रणा, संरक्षण अधिकारी, समुपदेशक किंवा अन्य संबंधित विभागांशी समन्वय साधून महिलांना सहाय्य केले जाते.
कायदेशीर मार्गदर्शनाची सुविधा
महिलांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच विविध कायद्यांबाबतही या हेल्पलाइनद्वारे मार्गदर्शन केले जाते. हुंडा प्रतिबंधक कायदा, महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक तरतुदी, बालविवाह प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा तसेच इतर कायदेशीर विषयांवर अधिकृत सल्ला मिळू शकतो.
कायदेशीर प्रक्रियेबाबत संभ्रम असलेल्या महिलांना योग्य दिशा देण्यासाठी तज्ज्ञ आणि संबंधित अधिकाऱ्यांची मदत उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे अनेक महिलांना न्याय मिळविण्याचा मार्ग सुकर होत आहे.
मानसिक आधार आणि समुपदेशन
कौटुंबिक किंवा सामाजिक समस्यांमुळे अनेक महिला मानसिक तणाव, नैराश्य किंवा भावनिक अस्थिरतेचा सामना करत असतात. अशा महिलांसाठी प्रशिक्षित समुपदेशकांमार्फत समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महिलांच्या भावना समजून घेत त्यांना मानसिक आधार देणे, समस्यांवर उपाय शोधण्यासाठी मार्गदर्शन करणे आणि आत्मविश्वास वाढविण्यास मदत करणे, हे या सेवेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे केवळ आपत्कालीन मदतीपुरतीच नव्हे तर भावनिक आणि मानसिक सक्षमीकरणासाठीही ही हेल्पलाइन उपयुक्त ठरत आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल
महिलांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांचे सक्षमीकरण आणि हक्कांचे संरक्षण हे ‘मिशन शक्ती’ अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. संकटाच्या काळात महिलांना तातडीने मदत मिळावी, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी ही यंत्रणा कार्यरत आहे.
राज्यातील प्रत्येक महिलेने कोणत्याही प्रकारच्या अडचणी, छळ किंवा संकटाच्या प्रसंगी न घाबरता १८१ महिला हेल्पलाइनशी संपर्क साधावा, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाकडून करण्यात आले आहे. महिलांसाठी विश्वासार्ह आणि तत्पर मदतीचे व्यासपीठ म्हणून ‘मिशन शक्ती’ची ही सेवा अधिक प्रभावी ठरत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.


