मुंबई प्रतिनिधी
बीकेसी (BKC) परिसरात सोमवारी रात्री एका दुर्मीळ प्रसंगात सात अजगरांची पिल्ले आणि एका कवड्या जातीच्या सापाला जीवनदान मिळाले. सेबी भवनजवळील पादचारी मार्गावर हे साप मानवी वस्तीच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी आणि सर्पमित्राने धाव घेत या जिवांचा जीव वाचवला. या कामगिरीमुळे प्राणीमित्रांकडून आणि स्थानिक नागरिकांकडून या बचाव पथकाचे कौतुक होत आहे.
नेमकी घटना काय?
काल, १५ जून २०२६ रोजी रात्री ८:५३ च्या सुमारास बीकेसी पोलीस ठाण्याला एक दूरध्वनी आला. सेबी भवनच्या बाजूला असलेल्या पादचारी मार्गावर असलेल्या इंटरनेट डकमधून अजगराची पिल्ले बाहेर येत असल्याची माहिती देण्यात आली. या माहितीची गंभीर दखल घेत बीकेसी पोलिसांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या.
सर्पमित्रांच्या मदतीने बचाव
माहिती मिळताच राउंड ऑफिसर रोशन शिंदे आणि वन विभाग मुंबई रेंज कंट्रोल रूमला कळवण्यात आले. त्यानंतर सर्पमित्र अतुल कांबळे आणि सर्पमित्र पोलीस हवलदार सचिन मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवळच मुख्य रस्ता असल्याने हे साप रस्त्यावर येऊन वाहनांखाली चिरडण्याची दाट शक्यता होती. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि सर्पमित्र अतुल कांबळे यांच्या कुशलतेमुळे एकूण सात अजगरांची पिल्ले आणि एका कवड्या सापाला सुखरूप पकडण्यात यश आले. हे सर्व साप बिनविषारी असून, नियमानुसार त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार आहे.
नागरिकांना आवाहन
बीकेसी परिसरातील एमएमआरडीए पटांगण ते मिठी नदी आणि भारत नगर टाटा बस स्थानक या मार्गावरून ये-जा करताना नागरिकांना असे साप किंवा वन्यजीव आढळल्यास घाबरून न जाता त्यांना इजा न पोहोचवता वन विभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वन्यजीवांचे संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचेही या वेळी नमूद करण्यात आले.


