मुंबई, प्रतिनिधी
देशातील माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या १९व्या आंतरराष्ट्रीय मुंबई चित्रपट महोत्सवाला रविवारी दादर येथील रवींद्र नाट्य मंदिरात उत्साहात प्रारंभ झाला. या उद्घाटन सोहळ्यात राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशीष शेलार यांनी मुंबईत अत्याधुनिक ‘मीडिया हब’ उभारण्याचा राज्य सरकारचा मानस जाहीर केला. केंद्र सरकारच्या सहकार्याने हा प्रकल्प साकारण्यात येणार असून, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्जनशील आणि डिजिटल माध्यम उद्योगाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय माहिती व प्रसारण तसेच संसदीय कार्य राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी देश-विदेशातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना शेलार म्हणाले, “मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी किंवा स्वप्ननगरी राहिलेली नाही. चित्रपट, मनोरंजन, डिजिटल मीडिया आणि सर्जनशील उद्योगांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याची क्षमता या शहरात आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीसारख्या उपक्रमांमुळे चित्रपट निर्मिती, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि डिजिटल कंटेंट क्षेत्रातील नव्या पिढीला आधुनिक कौशल्ये प्राप्त होतील.”
राज्यातील चित्रपटसृष्टीस प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सातत्याने धोरणात्मक निर्णय घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात चित्रपट आणि वेब सिरीजच्या चित्रीकरणासाठीची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून अनेक प्रकारच्या परवानग्या आणि शुल्कांमध्ये सवलती देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. प्रादेशिक चित्रपटांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीही राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
या वेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाढत्या जागतिक प्रभावाचा उल्लेख करताना माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनसारख्या माध्यमांची सामाजिक परिवर्तनात महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय कथा जगभर पोहोचविण्याची क्षमता या क्षेत्रात असल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्घाटन सोहळ्यात अभिनेता जयदीप अहलावत यांचा भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या अभिनय कारकिर्दीचा गौरव करत उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाला माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार, मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (एनएफडीसी) अध्यक्ष जी. कृष्णकुमार, महाराष्ट्र फिल्म, स्टेज अँड कल्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, ज्येष्ठ दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, किरण शांताराम यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
चित्रपटप्रेमींसाठी सांस्कृतिक मेजवानी
२१ जूनपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात भारतासह विविध देशांतील माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. विविध विषय, संस्कृती, सामाजिक प्रश्न आणि तांत्रिक नवकल्पना यांचे दर्शन घडविणारे चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर चित्रपट निर्माते, तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्रे, कार्यशाळा आणि संवाद सत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे.
चित्रपटसृष्टीतील नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच जागतिक चित्रपट प्रवाहांशी परिचय करून देणारा हा महोत्सव यंदाही चित्रपटप्रेमींसाठी एक महत्त्वाची सांस्कृतिक पर्वणी ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.


