मुंबई प्रतिनिधी
उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची घंटा सोमवारी पुन्हा एकदा वाजली. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी राज्यभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली असून, पहिल्याच दिवशी शाळा परिसर विद्यार्थ्यांच्या उत्साहाने आणि आनंदाने फुलून गेला. राज्य शासनाच्या निर्देशानुसार विविध ठिकाणी ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा करण्यात आला.
राज्यातील बहुतांश भागात १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या असल्या तरी विदर्भातील शाळा पावसाळी वेळापत्रकानुसार ३० जूनपासून सुरू होणार आहेत. दरम्यान, सकाळपासूनच शाळांबाहेर विद्यार्थ्यांची, पालकांची आणि शिक्षकांची लगबग पाहायला मिळाली. नवीन गणवेश, दप्तर, वह्या-पुस्तके आणि नव्या वर्गाची उत्सुकता यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते.
शालेय शिक्षण विभागाने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फुले, पुष्पगुच्छ, चॉकलेट, शैक्षणिक साहित्य तसेच स्वागतपर भेटवस्तू देण्यात आल्या. काही ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात, तर काही शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
विशेषतः इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांसाठी हा दिवस संस्मरणीय ठरावा यासाठी शिक्षकांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. शाळेविषयीची भीती दूर करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मीयता आणि आपलेपणाची भावना निर्माण करणे हा प्रवेशोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. अनेक शाळांमध्ये रंगीबेरंगी सजावट, स्वागत कमानी, फुगे आणि आकर्षक संदेशफलक लावण्यात आले होते.
यंदाच्या प्रवेशोत्सवात राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विविध शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करत आहेत. या माध्यमातून शिक्षणाबाबत सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल तालुक्यातील वव्हाळ जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतील विद्यार्थ्यांना भेटून आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शिक्षण हा विकासाचा पाया असून विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती जोपासावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ तालुक्यातील शाळेला भेट देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यभरात पहिल्याच दिवशी शाळांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने शाळांमध्ये निर्माण झालेली चैतन्यमय वातावरणनिर्मिती आणि लोकप्रतिनिधींचा सहभाग यामुळे नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय ठरल्याचे चित्र राज्यभर दिसून आले.


