जोरहाट (आसाम) :
आसाममधील जोरहाट हवाई दल तळावर शनिवारी भारतीय हवाई दलाच्या एएन-३२ (AN-32) लष्करी वाहतूक विमानाचा भीषण अपघात होऊन पाच जवानांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत सहवैमानिक जखमी झाला असून त्याच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी भारतीय हवाई दलाने ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश दिले आहेत.
हवाई दलाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंह, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीरवायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीरवायू दानिश आलम यांचा मृत्यू झाला. कर्तव्य बजावत असताना या जवानांनी सर्वोच्च बलिदान दिल्याचे नमूद करत हवाई दलाने त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
The Indian Air Force deeply regrets the loss of five personnel in the An-32 accident at Jorhat, Assam.
Sqn Ldr Prashant Singh, Flt Lt Shubham Kumar, Sgt Jitendra Sharma, Agniveervayu Khemaram Kumawat and Agniveervayu Danish Alam made the supreme sacrifice in the line of duty.… pic.twitter.com/9SmOjtS5mU
— Indian Air Force (@IAF_MCC) June 13, 2026
लँडिंगदरम्यान घडला अपघात
प्राथमिक माहितीनुसार, एएन-३२ हे लष्करी वाहतूक विमान शनिवारी सकाळी जोरहाट येथील रोवरिया हवाई पट्टीवर उतरण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. वैमानिकांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र काही क्षणांतच विमानाचा अपघात झाला.
अपघाताची तीव्रता इतकी होती की विमानाचे दोन तुकडे झाले आणि त्यानंतर भीषण आग लागली. घटनास्थळावरून आकाशात धुराचे मोठे लोट उठताना दिसत होते. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, वैद्यकीय पथके आणि बचाव कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवून बचावकार्य सुरू करण्यात आले.
#WATCH | IAF AN-32 Aircraft Crashes During Landing in Assam’s Jorhat#PlaneCrash | #IAF | #FPJ pic.twitter.com/lKaQwbYBQH
— Free Press Journal (@fpjindia) June 13, 2026
सहवैमानिकाचा जीव वाचला
विमानातील सहवैमानिक या दुर्घटनेतून बचावला असला तरी तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. मात्र विमानातील अन्य पाच जवानांना वाचविण्यात यश आले नाही.
चौकशीसाठी ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’
दुर्घटनेनंतर भारतीय हवाई दलाने तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. विमानाची तांत्रिक स्थिती, उड्डाणापूर्वीची तपासणी, लँडिंगच्या वेळी निर्माण झालेली परिस्थिती तसेच वैमानिकांनी केलेल्या प्रयत्नांचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. चौकशी अहवालानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री सरमा यांची प्रतिक्रिया
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिश्वा सलमा यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. प्राथमिक माहितीनुसार विमानात तांत्रिक बिघाड झाला असल्याचे समोर आले असले तरी जिल्हा प्रशासनाकडून सविस्तर अहवाल मागविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दुर्घटनेतील मृत जवानांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.
एएन-३२ विमानांची भूमिका महत्त्वाची
भारतीय हवाई दलाच्या वाहतूक ताफ्यात एएन-३२ विमानांना महत्त्वाचे स्थान आहे. दुर्गम भागांमध्ये सैनिक, रसद आणि आवश्यक सामग्री पोहोचविण्यासाठी या विमानांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. विशेषतः ईशान्य भारत आणि हिमालयीन भागातील कठीण हवामानातही ही विमाने कार्यरत असतात. त्यामुळे या दुर्घटनेने हवाई दलासह संरक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
देशभरातून श्रद्धांजली
दुर्घटनेनंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. विविध राजकीय नेते, संरक्षण क्षेत्रातील अधिकारी आणि नागरिकांनी सामाजिक माध्यमांद्वारे मृत जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रसेवेच्या कर्तव्यावर असताना प्राणांची आहुती देणाऱ्या या जवानांच्या शौर्याला आणि समर्पणाला देशभरातून सलाम करण्यात येत आहे.
या दुर्घटनेमुळे भारतीय हवाई दलावर शोककळा पसरली असून चौकशी अहवालाकडे संरक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे. मृत जवानांच्या पार्थिवांवर त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


