सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या कुस्तीविश्वातील लोकप्रिय आणि आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांचा गुरुवारी पहाटे भीषण अपघात झाला. सांगली जिल्ह्यातील विठ्ठलवाडी परिसरात नागपूर–रत्नागिरी महामार्गावर त्यांच्या ‘थार’ गाडीला अपघात झाला असून या दुर्घटनेत गाडीचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून सिकंदर शेख यांना पायाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदर शेख हे काही कामानिमित्त सोलापूरच्या दिशेने प्रवास करत होते. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील विठ्ठलवाडी येथे नागपूर–रत्नागिरी महामार्गावरून जात असताना त्यांच्या गाडीचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या साईड दुभाजकाला (डिव्हायडर) जोरदार धडक बसली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की, गाडीच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि मदत पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. सिकंदर शेख यांना तत्काळ सुरक्षित बाहेर काढण्यात आले. प्राथमिक तपासणीत त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातावेळी त्यांच्या वाहनात आणखी कोण प्रवास करत होते का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
विशेष म्हणजे, अपघातग्रस्त झालेली ‘थार’ ही गाडी सिकंदर शेख यांना त्यांच्या कुस्तीतील उल्लेखनीय यशानंतर बक्षीस म्हणून मिळाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या अपघाताची चर्चा कुस्तीप्रेमींसह राज्यभरातील क्रीडा वर्तुळात सुरू झाली आहे.
गरीबीतून महाराष्ट्र केसरीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
सिकंदर शेख हे सध्या भारतीय कुस्ती क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय पैलवानांपैकी एक मानले जातात. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ परिसरातील अत्यंत साध्या आणि आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी आपली कारकीर्द घडवली आहे. कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी कुस्ती क्षेत्रात मोठे यश मिळवले.
कोल्हापूरच्या ऐतिहासिक गंगावेश तालीम येथे वस्ताद विश्वास हारुगले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले. मातीतील कुस्तीतील आक्रमक डावपेच, जबरदस्त ताकद आणि लढाऊ वृत्तीमुळे त्यांनी अल्पावधीतच राज्यभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
महाराष्ट्र केसरी आणि रुस्तम-ए-हिंद किताबाचे मानकरी
सिकंदर शेख यांनी प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र केसरी’ किताब जिंकून राज्याच्या कुस्ती परंपरेला नवे वैभव मिळवून दिले. याशिवाय पंजाबमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत त्यांनी ‘रुस्तम-ए-हिंद’ हा बहुमानाचा किताब पटकावत महाराष्ट्राचे नाव देशभर उज्ज्वल केले. त्यांच्या या कामगिरीमुळे ते लाखो तरुण कुस्तीपटूंसाठी प्रेरणास्थान बनले आहेत.
दरम्यान, सिकंदर शेख यांच्या अपघाताची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी आणि कुस्तीप्रेमींनी चिंता व्यक्त केली होती. मात्र, त्यांना गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा अधिक तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असल्याची माहिती मिळत आहे.


