सातारा प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) महाबळेश्वर आगारात प्रवाशांशी उद्धट वर्तन केल्याप्रकरणी आणि पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याच्या आरोपावरून वाहतूक नियंत्रक शाहरूख बशीर खान यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी सोमवारी सकाळी ही कारवाई केली. संबंधित घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर एसटी प्रशासनाने तत्काळ दखल घेत ही कारवाई केल्याची माहिती मिळाली.
महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटनस्थळांवर सध्या उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. त्यातच रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने महाबळेश्वर बसस्थानकावर प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली होती. अशा परिस्थितीत दुपारी साडेतीन वाजता सुटणारी एसटी बस तब्बल एक तास उशिराने सुटल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले.
बस उशिरा का सुटत आहे, याबाबत प्रवाशांनी चालक आणि वाहक यांच्याकडे चौकशी केली. त्यानंतर परिस्थितीची माहिती मिळताच वाहतूक नियंत्रक शाहरूख खान घटनास्थळी पोहोचले. मात्र, त्यांनी प्रवाशांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न देता उलट आक्रमक भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, बसस्थानकावर सुरू असलेल्या गोंधळाचे काही प्रवासी आणि पत्रकारांकडून चित्रीकरण केले जात होते. याच कारणावरून वाहतूक नियंत्रक संतप्त झाल्याचे सांगितले जाते. त्यांनी संबंधित चालकाला बसमधून खाली उतरवून चित्रीकरण करणाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यावेळी एका पत्रकाराने “बसला एवढा विलंब का झाला?” असा प्रश्न विचारला असता, “जो कोणी पत्रकार असेल त्याने खाली यावे, त्यानंतरच बस जाईल,” अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
यावेळी पत्रकारांविषयी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचाही आरोप आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काही वेळातच समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये प्रवासी शांतपणे आपली तक्रार मांडत असताना वाहतूक नियंत्रकांकडून उद्धटपणे उत्तरे दिली जात असल्याचे दिसून येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकारामुळे एसटी प्रशासनाची प्रतिमा मलिन झाल्याची भावना अनेक प्रवासी आणि नागरिकांनी व्यक्त केली.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सातारा विभागीय कार्यालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली. प्राथमिक चौकशीत संबंधित कर्मचाऱ्याचे वर्तन सेवाशिस्तीला धरून नसल्याचे आढळून आल्याने विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी शाहरूख खान यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.
याबाबत बोलताना गायकवाड म्हणाल्या, “सर्वसामान्य प्रवासी हे एसटीचे दैवत आहेत. त्यांच्या अडचणी समजून घेऊन कर्मचाऱ्यांनी सौजन्यपूर्ण व जबाबदार वर्तन करणे अपेक्षित असते. पत्रकारांबाबत अपशब्द वापरणे आणि प्रवाशांशी गैरवर्तन करणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. अशा घटनांमुळे एसटीची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.”
या कारवाईमुळे एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या शिस्तीबाबत कठोर भूमिका घेतल्याचा संदेश गेला असून, सार्वजनिक सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


