मुंबई प्रतिनिधी
मुंबई : उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देत नैऋत्य मान्सूनची देशभरात वेगाने आगेकूच सुरू आहे. केरळनंतर महाराष्ट्रातही मान्सूनचे वेळेत आगमन झाले असून, पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने (IMD) दिला आहे. देशातील तब्बल १९ राज्यांमध्ये वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
9:45 PM.. Heavy rains 100-200 km away from Mumbai & MMR tonight, over Western Maharashtra, and parts of Ratnagiri & South Konkan ⛈️#MumbaiRains missing most of these yet rain bands are tracking westwards so will be hit & miss again. pic.twitter.com/Lpah9fI6zr
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) June 7, 2026
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल तसेच ईशान्य भारतातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. काही ठिकाणी ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मान्सूनच्या आगमनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, खरीप हंगामाच्या तयारीला वेग येण्याची अपेक्षा आहे. सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात सक्रिय झालेल्या हवामान प्रणालींमुळे उत्तर, पूर्व आणि दक्षिण भारतातील वातावरणात मोठे बदल होत आहेत. अनेक भागांत कडक उन्हानंतर अचानक पाऊस, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांचा अनुभव येत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून आणखी वेगाने पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो छत्तीसगड, ओडिशा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमपर्यंत पोहोचू शकतो. दरम्यान, जोरदार वाऱ्यांमुळे झाडे उन्मळून पडणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पावसाचा वाढता जोर लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.


