मुंबई प्रतिनिधी
मुंबई: वरळी येथील प्रसिद्ध एन एस सी आय डोममध्ये एका लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान एका तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेने सांस्कृतिक वर्तुळात मोठी खळबळ माजली असून, कार्यक्रमात सहभागी झालेल्या तरुणाईमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या संगीतमय कार्यक्रमाचा आनंद लुटत असताना संबंधित तरुणाची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वरळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांना काही गंभीर संशय असल्याचे सूत्रांकडून समजते. या पार्टीत अंमली पदार्थांचा वापर झाला होता का आणि मृत्यूचा त्याशी काही संबंध आहे का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. प्राथमिक तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. या अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल. पोलिसांनी आयोजकांकडे कार्यक्रमाचे सीसीटीव्ही फुटेज मागवले असून ते तपासले जात आहे. तसेच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींचे जबाबही नोंदवण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या एका कॉन्सर्टदरम्यान अंमली पदार्थामुळे काही तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता वरळीत अशीच घटना घडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या प्रकरणात नेमका काय प्रकार घडला, हे पोलीस तपासाअंती स्पष्ट होईल.


