मुंबई प्रतिनिधी
मुंबई: सर्पदंशावरील प्रभावी उपचारपद्धती विकसित करण्यासह जागतिक आरोग्य संशोधनाला बळ देण्यासाठी मुंबईतील हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था आणि घाना सरकारच्या सेंटर फॉर प्लांट मेडिसिन रिसर्च या दोन महत्त्वाच्या संस्थांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. परळ येथील हाफकिनच्या मुख्यालयात या दोन्ही संस्थांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाची नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून यात वैज्ञानिक संशोधनाच्या विविध संधींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आशिया आणि आफ्रिकेतील ग्रामीण भागात सर्पदंशाची समस्या गंभीर असून यावर स्वस्त व प्रभावी उपचार उपलब्ध करून देणे हे दोन्ही देशांपुढील मुख्य आव्हान आहे. या बैठकीत पारंपरिक वनस्पतीजन्य औषधांचे वैज्ञानिक प्रमाणीकरण करण्यावर विशेष भर देण्यात आला. यासोबतच झेब्राफिशवर आधारित प्रीक्लिनिकल मॉडेल्स तयार करणे आणि विषशास्त्र क्षेत्रात संयुक्त संशोधन प्रकल्प राबविण्याबाबत दोन्ही संस्था सकारात्मक आहेत. जागतिक स्तरावरील संशोधन अनुदानासाठी संयुक्त प्रस्ताव सादर करणे आणि संशोधक व विद्यार्थ्यांची देवाणघेवाण करणे यांसारख्या मुद्द्यांवरही यावेळी प्राथमिक सहमती झाली.
हाफकिन संस्थेच्या संचालक डॉ. सुवर्णा खरात यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत घानाच्या शिष्टमंडळाने सहभागी होऊन दोन्ही देशांतील वैज्ञानिक संबंधांना नवी दिशा दिली आहे. या शिष्टमंडळात सीपीएमआरचे अध्यक्ष हेन्री रॉकफेलर निम्बाबोउरा, कार्यकारी संचालक प्रा. ॲलेक्स असासे यांच्यासह वरिष्ठ शास्त्रज्ञ व अधिकारी उपस्थित होते. या सहकार्यामुळे युवा वैज्ञानिकांना जागतिक दर्जाच्या संशोधन पद्धतींचा अनुभव घेण्याची संधी मिळेल. तसेच जैवविविधतेवर आधारित औषध संशोधनामुळे उष्णकटिबंधीय देशांतील आरोग्य समस्यांवर ठोस तोडगा काढणे शक्य होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. भारत व घाना यांच्यातील ही वैज्ञानिक भागीदारी सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील नवनवीन मानदंड प्रस्थापित करणारी ठरेल, अशी चिन्हे आहेत.


