मुबई प्रतिनिधी
मुंबई : भाजपच्या एका पदाधिकाऱ्याविरोधात महिला कार्यकर्तीने लैंगिक छळाची तक्रार दाखल केल्यानंतर डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. युसूफ रंगवाला असे आरोपीचे नाव असून तो कुलाबा विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक २२४चा अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे.
तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, रंगवाला यांनी रात्री उशिरा फोन करून तिच्या घरी येण्याची इच्छा व्यक्त केली. महिलेने नकार दिल्यानंतरही त्यांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तसेच, व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलदरम्यान आरोपी नग्न अवस्थेत दिसल्याचा आणि अश्लील हावभाव केल्याचा गंभीर आरोप महिलेने तक्रारीत केला आहे.
या प्रकारामुळे मानसिक त्रास झाल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. तक्रारीच्या आधारे डोंगरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आरोपीवरील आरोपांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागले आहे. पोलिसांकडून डिजिटल पुराव्यांची पडताळणी करण्यात येत असून आरोपीची चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.


