उमेश गायगवळे मुंबई
२०१० साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट शिक्षणाच्या आईचा घो हा त्या काळातील शिक्षण व्यवस्थेवर मारलेला थेट प्रहार होता. पालकांच्या अपेक्षा, विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण, गुणांची जीवघेणी स्पर्धा आणि शिक्षणाचं वाढत चाललेलं व्यापारीकरण यावर या चित्रपटाने अत्यंत प्रखर भाष्य केलं होतं. अनेकांना तो चित्रपट अतिशयोक्ती वाटला होता; मात्र आज, तब्बल सोळा वर्षांनंतर वास्तव त्या चित्रपटापेक्षाही अधिक भीषण स्वरूपात आपल्या समोर उभं आहे. कारण त्या वेळी शिक्षण व्यवस्थेवर फक्त प्रश्नचिन्ह होतं, पण आज संपूर्ण व्यवस्थेवरच अविश्वास निर्माण झाला आहे.
आज शिक्षण हे ज्ञान, संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकासाचं माध्यम राहिलेलं नाही; ते अब्जावधी रुपयांचा व्यवसाय बनलं आहे. शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, टेस्ट सिरीज, डिजिटल नोट्स, मॉक टेस्ट, मेडिकल प्रवेश, इंजिनियरिंग सीट्स, रँकर्स बॅच, ऑनलाइन कोर्सेस, या सगळ्याभोवती एवढं मोठं आर्थिक साम्राज्य उभं राहिलं आहे की विद्यार्थ्यांच्या भविष्याचा अक्षरशः सौदा सुरू आहे. शिक्षण क्षेत्रातील या बाजारपेठेने विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य, पालकांची आर्थिक कोंडी आणि शिक्षणातील नैतिकता तिन्ही गोष्टी गिळंकृत केल्या आहेत.
नीट पेपरफुटी प्रकरणाने या व्यवस्थेचा विदारक चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आणला. तब्बल २२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याची भावना आज लाखो कुटुंबांच्या मनात आहे. विद्यार्थ्यांनी दिवस-रात्र अभ्यास करून, पालकांनी कर्ज काढून क्लासेसची फी भरून, घरातील सुखसोयी कमी करून मुलांना डॉक्टर बनवण्याचं स्वप्न पाहिलं; पण शेवटी प्रश्न उभा राहिला, मेहनत महत्त्वाची की सेटिंग?
या प्रकरणात समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. आरसीसी क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याच्याशी संबंधित काही व्हिडिओ समोर आले. तपास यंत्रणांनी त्याची गंभीर दखल घेतली. मुख्य परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना दिलेल्या ६० पानांच्या हस्तलिखित पीडीएफमधील तब्बल १३५ प्रश्न मुख्य नीट प्रश्नपत्रिकेशी जुळल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. हा साधा योगायोग नव्हता; तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेतील सडलेपणाचा पुरावा होता. सर्वात भयानक बाब म्हणजे या रॅकेटमध्ये शिक्षकांची नावंही चर्चेत आली. म्हणजे ज्यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा शिकवायचा, तेच जर प्रश्नपत्रिका फोडण्याच्या साखळीत असतील, तर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर?
आज महाराष्ट्रातील प्रत्येक शहर, जिल्हा आणि तालुक्यात कोचिंग क्लासेसचं जाळं पसरलं आहे. एकेकाळी कोहिनूर, चाटे असे काही मोजकेच नामांकित क्लासेस होते. पण आता प्रत्येक चौकात “टार्गेट मेडिकल”, “रँकर्स अकॅडमी”, “क्रॅश कोर्स”, “नीट गुरुकुल”, “फाउंडेशन बॅच” अशी नावं झळकत आहेत. क्लासेसच्या जाहिराती पाहिल्या की जणू एखाद्या चित्रपटाचा प्रचार सुरू आहे असं वाटतं. शहरभर टॉपर विद्यार्थ्यांचे फोटो, AIR रँक, ९९ टक्के, मेडिकल सिलेक्शनचे बोर्ड लावले जातात. विद्यार्थी हा आता माणूस राहिलेला नाही; तो क्लासेससाठी “रिझल्ट देणारा ब्रँड” बनला आहे.
या स्पर्धेत हरवतो तो विद्यार्थ्यांचा श्वास.
आज दहावी-बारावीचा विद्यार्थी सकाळी शाळा, दुपारी क्लास, संध्याकाळी टेस्ट, रात्री ऑनलाइन लेक्चर आणि रविवारी मॉक टेस्ट अशा चक्रात अडकला आहे. त्याला खेळ नाही, छंद नाही, मानसिक विश्रांती नाही. फक्त अभ्यास, स्पर्धा, रँक आणि गुण. समाजाने यशाची व्याख्या इतकी मर्यादित केली आहे की डॉक्टर किंवा इंजिनियर न झाल्यास विद्यार्थी अपयशी मानला जातो. ही मानसिकता विद्यार्थ्यांना आतून पोखरत आहे.
पालकांचाही यात तितकाच वाटा आहे. अनेक पालक मुलांची आवड समजून घेत नाहीत; ते स्वतःची अपूर्ण स्वप्नं मुलांवर लादतात. “माझा मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे”, “मुलगी आयआयटीत गेली पाहिजे”, “शेजाऱ्याच्या मुलाला ९८ टक्के आले, तुला कमी का?” अशा तुलना विद्यार्थ्यांच्या मनावर खोल जखमा करतात. आज विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं वाढतं प्रमाण ही फक्त आकडेवारी नाही; ती शिक्षण व्यवस्थेची सामूहिक हत्या आहे.
कोटा असो, पुणे असो, लातूर असो किंवा मुंबई, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आता धक्कादायक न राहता “नेहमीची बातमी” बनत चालल्या आहेत. दोन दिवस समाज हळहळ व्यक्त करतो आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा नवीन टॉपरच्या मुलाखती सुरू होतात. यापेक्षा मोठं सामाजिक अपयश दुसरं कोणतं असू शकतं?
खरंतर शिक्षणाने माणूस घडायला हवा होता. पण आज शिक्षण विद्यार्थ्यांना मोडत आहे.
कोचिंग क्लासेसचा व्यवसाय आता एवढा मोठा झाला आहे की काही ठिकाणी तो राजकारण, प्रशासन आणि पैशाच्या साखळीशी जोडला गेल्याची चर्चा उघडपणे होते. लाखोंच्या फी, एसी क्लासरूम, डिजिटल बोर्ड, आकर्षक जाहिराती, रँकर्सचे होर्डिंग्ज, सगळं काही आहे; पण विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेशक नाहीत. कारण शिक्षण आता सेवा राहिलेली नाही; तो नफा कमावणारा उद्योग झाला आहे.
सरकारची भूमिकाही तितकीच प्रश्न निर्माण करणारी आहे. प्रत्येक घोटाळ्यानंतर चौकशी समित्या बसतात, तपास सुरू होतो, काही आरोपी अटक होतात आणि काही दिवस माध्यमांमध्ये चर्चा रंगते. पण व्यवस्थेतील मूलभूत बदल मात्र होत नाहीत. नीट पेपरफुटी प्रकरणातही तोच प्रश्न आहे. फक्त काही आरोपींना अटक करून २२ लाख विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळणार आहे का?
कोचिंग क्लासेससाठी कठोर नियमावली येणार का? प्रवेश परीक्षांची गोपनीयता सुरक्षित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जाणार का? पेपरफुटी रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा होणार का? विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरण तयार होणार का?
की पुन्हा एखाद्या वर्षी दुसऱ्या परीक्षेचा पेपर फुटेल आणि सरकार “चौकशी सुरू आहे” एवढंच सांगत राहील?
आज परिस्थिती अशी झाली आहे की विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेपेक्षा “नेटवर्क” महत्त्वाचं वाटू लागलं आहे. मेहनतीपेक्षा सेटिंग, अभ्यासापेक्षा गेस पेपर, प्रामाणिकपणापेक्षा लीक, हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत गेला तर तो देशाच्या भवितव्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. कारण उद्याचे डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी आणि वैज्ञानिक हे जर फसवणुकीच्या पायावर उभे राहिले, तर त्या समाजाचं भविष्य किती भयावह असेल याची कल्पनाही करवत नाही.
डिजिटल युगाने शिक्षणाला प्रचंड संधी दिली; पण त्याचबरोबर फसवणुकीची दारंही उघडली. ऑनलाइन टेस्ट, टेलिग्राम ग्रुप, पीडीएफ लीक, डेटा चोरी, एआय-आधारित चीटिंग, या नव्या युगातील गुन्हे व्यवस्थेपेक्षा अधिक वेगाने वाढत आहेत. प्रश्नपत्रिका छापखान्यातून बाहेर पडण्याआधी मोबाईलवर फिरू लागते, ही परिस्थिती धोक्याची घंटा आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे विद्यार्थ्यांमध्येही चुकीच्या मार्गाला “शॉर्टकट” म्हणून स्वीकारण्याची मानसिकता वाढत आहे. “सगळेच करतात”, “पेपर आधी मिळाला तर काय बिघडलं?”, “रँक महत्त्वाची” हे विचार शिक्षण व्यवस्थेच्या नैतिक दिवाळखोरीचं लक्षण आहेत.
माध्यमांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. टॉपर संस्कृतीचा अतिरेक करून आपण विद्यार्थ्यांवर अजून ताण वाढवत आहोत का? ९९ टक्के मिळवणाऱ्यांचे सत्कार होतात; पण अपयशी विद्यार्थ्याच्या नैराश्यावर चर्चा होत नाही. समाजाला फक्त यश दिसतं; संघर्ष दिसत नाही.
आज मूलभूत प्रश्न हा आहे की शिक्षणाचा खरा उद्देश काय?
विद्यार्थ्याला विचार करायला शिकवणं, त्याच्यात माणुसकी निर्माण करणं, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणं आणि समाजाबद्दल संवेदनशील बनवणं, हे शिक्षणाचं उद्दिष्ट असायला हवं होतं. पण आज शिक्षण फक्त स्पर्धा परीक्षा पास करण्याचं यंत्र बनलं आहे.
“शिक्षणाच्या आईचा घो” या चित्रपटाने ज्या वेडेपणाचा इशारा दिला होता, त्याचं भयावह वास्तव आज नीट पेपरफुटी प्रकरणातून दिसत आहे. शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा करणाऱ्या या व्यवस्थेला आता कठोर लगाम घालण्याची गरज आहे. कोचिंग क्लासेसवर नियंत्रण आणणारा कठोर कायदा, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, प्रश्नपत्रिकेच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञान, विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य केंद्रे आणि गुणांपेक्षा कौशल्यांना महत्त्व देणारी शिक्षण पद्धती, हे बदल आता अपरिहार्य झाले आहेत.
अन्यथा उद्या पुन्हा एखादा पेपर फुटेल… पुन्हा लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरतील… पुन्हा चौकशा होतील… पुन्हा आरोपी अटक होतील… आणि पुन्हा सर्व काही विसरलं जाईल…
पण त्या दरम्यान एखादा विद्यार्थी कायमचा तुटलेला असेल… एखाद्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असेल… एखाद्या मुलाचं स्वप्न कायमचं संपलेलं असेल…
आणि मग पुन्हा समाज संतापाने म्हणेल-
“ही शिक्षण व्यवस्था नाही… हा तर शिक्षणाच्या आईचा घो आहे!”


