मुंबई, प्रतिनिधी
मुंबई महापालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या (सायन रुग्णालय) टप्पा-२ विस्तारीकरण प्रकल्पामुळे मुंबईसह राज्यातील नागरिकांना अत्याधुनिक आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या प्रकल्पामुळे सध्याच्या सुमारे १९०० खाटांवरून रुग्णालयाची क्षमता तब्बल ३,२८६ खाटांपर्यंत वाढणार आहे.
सायन रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या टप्पा-२ च्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या वेळी महापौर रितू तावडे, मुंबई महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासन आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मुंबईतील प्रत्येक नागरिकाला मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा शासनाचा संकल्प आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि रुग्णसंख्येमुळे सायन रुग्णालयावर मोठा ताण येत असून, त्यासाठी रुग्णालयाचे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण करणे अत्यावश्यक होते. या पार्श्वभूमीवर सुमारे २,५०० कोटी रुपयांच्या खर्चातून हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारला जात असून २०३० पर्यंत त्याचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
सायन रुग्णालयाची स्थापना १९४७ साली अवघ्या ६० खाटांपासून झाली होती. गेल्या सात दशकांत या रुग्णालयाचा विस्तार होत आज ते सुमारे १९०० खाटांचे महत्त्वाचे शासकीय आरोग्य केंद्र बनले आहे. विस्तारानंतर रुग्णालयाची क्षमता ३,२८६ खाटांपर्यंत वाढणार असून मुंबईसह राज्यातील लाखो रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे रुग्णालय आधीपासूनच अनेक विशेष सुविधांमुळे ओळखले जाते. आशियातील मोठ्या ट्रॉमा केअर केंद्रांपैकी एक, तसेच ह्युमन मिल्क बँक आणि भाजलेल्या रुग्णांसाठी स्किन बँक यांसारख्या सुविधा येथे उपलब्ध आहेत. नव्या प्रकल्पामुळे या सुविधा अधिक सक्षम होणार आहेत.
असा असेल सायन रुग्णालयाचा नवा आराखडा
सायन रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पात अनेक आधुनिक इमारती व वैद्यकीय सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये-
• सुमारे २५०० कोटी रुपयांचा प्रकल्प खर्च
• २५ मजली निवासी टॉवर – डॉक्टर व नर्सेससाठी निवास व्यवस्था
• १३ मजली कॅन्सर केअर सेंटर
• १५ मजली मुख्य रुग्णालय इमारत
• १४ मजली आपत्कालीन विभाग (इमर्जन्सी ब्लॉक)
• १३ मजली बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी)
• ४० हून अधिक अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स
• एमआरआय, सीटी स्कॅनसह प्रगत निदान सुविधा
या सर्व सुविधांमुळे मुंबईतील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.
आरोग्य व्यवस्थेच्या नव्या युगाची सुरुवात – महापौर
या वेळी महापौर रितू तावडे म्हणाल्या की, सायन रुग्णालयाचा हा प्रकल्प केवळ इमारतींचा विस्तार नसून मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेच्या नव्या युगाची सुरुवात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आरोग्य व पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम होत आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीमुळे गेल्या काही वर्षांत हजारो रुग्णांना उपचार मिळाले असून ही योजना आता नागरिकांच्या हक्काची आरोग्यसुरक्षा बनत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सायन रुग्णालयाचा हा विस्तार प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मोठा बळकटी मिळेल आणि राज्यभरातून येणाऱ्या रुग्णांना अधिक सक्षम व आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.


