मुंबई प्रतिनिधी
राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान, फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत प्रतीक्षा करणाऱ्या लाखो महिलांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून यासंदर्भातील शासन निर्णय (GR) देखील जारी करण्यात आला आहे.
सरकारच्या निर्णयानुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी तब्बल ३,९६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वित्त विभागाच्या मान्यतेनुसार, फेब्रुवारी २०२६ महिन्याच्या हप्त्यासाठी २७७.२६ कोटी रुपये इतका निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लवकरच पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी निधी वितरणासंदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर आता लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रशासनाकडून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होणार असल्याने कोणत्याही क्षणी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता खात्यात जमा होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
१५०० रुपये की ३००० रुपये?
दरम्यान, काही दिवसांपूर्वी फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे मिळून एकत्रित ३००० रुपये देण्यात येणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र सरकारने सध्या फेब्रुवारी २०२६ या महिन्याच्या हप्त्यासाठीच २७७.२६ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला लाभार्थींना फक्त फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.
e-KYC दुरुस्तीसाठी शेवटची संधी
दरम्यान, या योजनेत e-KYC प्रक्रियेदरम्यान काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने त्यांना लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या होत्या. विशेषतः e-KYC पूर्ण करूनही अद्याप लाभ न मिळालेल्या महिलांसाठी सरकारने पुन्हा एक संधी उपलब्ध करून दिली आहे.
महिला व बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लाभार्थ्यांना ३१ मार्च २०२६ पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर e-KYC माहितीमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ज्या महिलांच्या e-KYC प्रक्रियेत चूक झाली आहे त्यांनी मुदतीपूर्वी ती दुरुस्त करून घ्यावी, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
राज्य सरकारची ही योजना महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली असून, लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे फेब्रुवारी हप्त्याचा निधी मंजूर झाल्याने राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


