भाईंदर प्रतिनिधी
रामनवमीच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाने मिरा-भाईंदर शहरातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबवत मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. या सेवेला औपचारिक प्रारंभ अमित राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. सत्तेत नसतानाही सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत मनसेने हा उपक्रम सुरू केल्यामुळे शहरात त्याचे स्वागत होत आहे.
मिरा-भाईंदर परिसरात लोकसंख्येच्या तुलनेत मोफत उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकांची संख्या अत्यल्प असल्याची बाब अनेकदा पुढे आली आहे. अनेक वेळा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका मिळत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांना २४ तास तत्काळ सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने मनसेने मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
या रुग्णवाहिका सेवेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, तसेच रुग्णवाहिकांच्या नावाखाली होणाऱ्या कथित गैरप्रकारांना आळा बसावा, हा देखील या उपक्रमामागील उद्देश असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील नागरिकांना आपत्कालीन प्रसंगी विनामूल्य आणि तत्पर सेवा मिळणार असल्याने हा उपक्रम आरोग्य व्यवस्थेसाठी पूरक ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मनसेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये विद्यार्थी सेनेचे प्रमुख संघटक दीपक शर्मा, शहर संघटक शशी मेंडन, शहर सचिव हरेश सुतार, माथाडी कामगार सेनेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, विधानसभा अध्यक्षा वैशाली येरूनकर, उपशहर अध्यक्षा दृष्टी घाग, हिम्मत भोईर, लीला खडसे, शहर सचिव दिलीप घाग, विभाग अध्यक्ष उदय साताराडेकर, योगी भोईर, रत्ना मंडल आदींचा समावेश होता.
मनसेकडून सुरू करण्यात आलेल्या या मोफत रुग्णवाहिका सेवेमुळे मिरा-भाईंदर शहरातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, आपत्कालीन आरोग्यसेवेत नागरिकांना तातडीची मदत मिळण्यास या उपक्रमामुळे महत्त्वाची मदत होणार असल्याची प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.


