• महाराष्ट्रात गुन्हा नोंद न झाल्याने कर्नाटकात धाव; 66 पानांची कागदपत्रे सादर, गुन्हेगारी षडयंत्राचा आरोप
मुंबई प्रतिनिधी
विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी सातत्याने होत होती. विशेषतः आमदार रोहित पवार यांनी या घटनेची स्वतंत्र गुन्हेगारी चौकशी व्हावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर या प्रकरणात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला असून कर्नाटकातील बेंगळुरू येथील हाय ग्राऊंड पोलीस ठाण्यात ‘झिरो एफआयआर’ नोंदवण्यात आला आहे.
लाईव्ह |📍विधान भवन, मुंबई ⏭️ 24-03-2026 पत्रकारांशी संवाद https://t.co/LTMAM0MZcy
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 24, 2026
रोहित पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम ६१, १०३, १०५, १०६, १२५, २३८ आणि ३३६(२) या विविध कलमांखाली प्रकरण नोंद करण्यात आले आहे. मात्र या झिरो एफआयआरमध्ये अद्याप कोणत्याही व्यक्तीचे नाव आरोपी म्हणून नमूद करण्यात आलेले नसून ‘सर्व संबंधित व्यक्ती’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
रोहित पवार यांनी यापूर्वी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन तसेच बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, तेथे गुन्हा नोंदवला गेला नव्हता. त्यामुळे अखेर त्यांनी कर्नाटक पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी त्यांनी तब्बल 66 पानांची कागदपत्रे पोलिसांकडे सादर केली असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
या संदर्भात कर्नाटक पोलिसांकडून दाखल करण्यात आलेला एफआयआर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात आल्याची माहितीही रोहित पवार यांनी दिली. आता त्यानुसार महाराष्ट्रात गुन्हा नोंदवून पुढील तपास केला जाणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
“कर्नाटकातील पोलीस प्रशासन अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत आहे. मात्र महाराष्ट्रातील पोलीस याबाबत कारवाई का करत नाहीत?” असा सवालही रोहित पवार यांनी केला.
दरम्यान, या झिरो एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, सीआयडीकडून सध्या या घटनेचा तपास केवळ अपघाती मृत्यू अहवालाच्या (Accidental Death Report) अनुषंगाने केला जात आहे. मात्र या घटनेत गुन्हेगारी षडयंत्र असण्याची शक्यता असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा स्वतंत्रपणे गुन्हेगारी तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या घडामोडींमुळे अजित पवार यांच्या मृत्यूशी संबंधित विमान अपघात प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून पुढील काळात या प्रकरणाच्या तपासाची दिशा काय असणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


