मुंबई प्रतिनिधी
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यातील राजकारण ढवळून निघाले असून या प्रकरणातील धक्कादायक तपशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उघड केले. खरातने किमान पाच महिलांचे लैंगिक शोषण केले असून आठ महिलांचे तब्बल ३५ अश्लील व्हिडिओ समोर आल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. महिलांवर अमानुष अत्याचार करत अघोरी प्रथा वापरल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
विधानसभेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. आरोपी अशोक खरात महिलांना “दैवी शक्ती”, “शुद्धीकरण” आणि “उपचार” या नावाखाली बोलावून त्यांची फसवणूक करत असे. स्वतःला “शंकराचा अवतार” असल्याचे सांगून किंवा “तुझ्या मुलांचे अनर्थ होईल” अशी भीती दाखवत तो महिलांना धमकावत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
गुंगी आणून अत्याचार
फडणवीस यांच्या माहितीनुसार, खरात महिलांना “मंतरलेले पाणी” किंवा “मिठाई” देऊन गुंगी आणत असे. त्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याचे व्हिडिओ चित्रित केले जात होते. एका पीडित महिलेला तांब्याच्या बाटलीतील मंतरलेले पाणी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्या महिलेला गर्भधारणा झाल्यानंतर गोळ्या देऊन तिचा गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक तपशीलही समोर आला आहे.
अघोरी प्रकारांनी महिलांना धमकावणे
महिलांना घाबरवण्यासाठी कार्यालयात नकली साप किंवा वाघ दाखवणे, अंगावर हात फिरवणे, तसेच महिलांना लघवी पाजणे यांसारखे अघोरी आणि अमानुष प्रकारही आरोपी करत असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. या कृत्यांमुळे अनेक महिलांना मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
देश सोडून पळण्याचा प्रयत्न
या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर आरोपी खरात देश सोडून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे त्याच्याविरोधात लूकआउट नोटीस जारी करण्यात आली. पोलिसांनी त्याच्या ठिकाणांवर छापे टाकून सहा लाख रुपये रोख रक्कम, दोन लॅपटॉप तसेच फार्महाऊसमधून काडतुसे जप्त केली आहेत.
संपत्ती आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी
सभागृहात बोलताना फडणवीस यांनी खरातच्या संपत्तीबाबतही माहिती दिली. मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, नवी मुंबई आणि पुणे येथे त्याची मालमत्ता असल्याचा तपशील तपासात समोर आला आहे. तसेच खरातचे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आर्थिक व्यवहार होते का, याचीही चौकशी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
SIT कडून तपास
आतापर्यंत अशोक खरातविरोधात एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी सात गुन्ह्यांचा तपास एसआयटीकडे (SIT) सोपवण्यात आला असून एक गुन्हा नाशिक शहर गुन्हे शाखेकडे आहे. हे गुन्हे
“महाराष्ट्र नरबळी प्रतिबंध व इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा तसेच जादूटोणा निर्मूलन कायदा”
अंतर्गत नोंदवण्यात आले आहेत.
मोबाईल डेटा तपासासाठी फॉरेन्सिक लॅबकडे
खरातच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवण्यासाठी तो मुंबईतील सायबर फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आला आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या पेनड्राइव्हमधील व्हिडिओंच्या आधारे इतर पीडित महिलांचा शोध सुरू असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. अश्लील कृत्यांचे व्हिडिओ पोलिसांना देणाऱ्या साक्षीदाराला पोलीस संरक्षण देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
या संपूर्ण प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात व्यक्त केला. दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


