मुंबई प्रतिनिधी
मुंबई : उपनगरातील मुलुंड रेल्वे स्थानकावर पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, आरोपी पतीला सूरत येथून अटक करण्यात आली आहे.
मुलुंड पश्चिमेतील रामगड परिसरात राहणारे राजू गुप्ता आणि पुष्पा गुप्ता यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. कौटुंबिक कलहाला कंटाळून पुष्पा यांनी १३ फेब्रुवारी रोजी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर त्या मोठ्या मुलासह उत्तर प्रदेशातील माहेरी गेल्या होत्या, तर लहान मुलगा पतीसोबतच होता.
दरम्यान, दोघांमधील वाद मिटवण्यासाठी पुष्पा यांचे भाऊ कमलेश कुमार यांनी पुढाकार घेतला. १४ मार्च रोजी ते पुष्पासह मुलुंडला आले. मात्र, घरी आल्यानंतर पुन्हा वादाला सुरुवात झाली. त्यानंतर पुष्पा यांनी पतीविरोधात दुसरी तक्रार दाखल केली.
यानंतर कमलेश आणि पुष्पा नातेवाईकांकडे जाण्यासाठी मुलुंड रेल्वे स्थानकावर गेले. याचदरम्यान कमलेश यांच्या वॉलेटमधील एटीएम, पॅन कार्ड आणि ओळखपत्र गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांनी राजूला संपर्क साधला असता कागदपत्रे घरी असल्याचे त्याने सांगितले. कमलेश घरी गेले असता राजूने त्यांना घरात कोंडल्याची माहिती समोर आली.
दरम्यान, राजू लहान मुलासह मुलुंड रेल्वे स्थानकावर पोहोचला. तेथे पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी पुष्पा यांनी घटस्फोटाची मागणी केली. यामुळे संतप्त झालेल्या राजूने कल्याणकडे जाणाऱ्या धावत्या लोकलसमोर पुष्पाला ढकलून दिले. या भीषण घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकाने त्याचा पाठलाग करून सूरत येथून अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.


