मुंबई प्रतिनिधी
पश्चिम रेल्वेवरील वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील अस्वच्छतेचा मुद्दा एका विदेशी पर्यटकाने चित्रित केलेल्या व्हिडिओमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. समाजमाध्यमांवर हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने हालचाल करत स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.
अलीकडे झालेल्या टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने अनेक विदेशी पर्यटक मुंबईत आले होते. त्यापैकी एका पर्यटकाने वांद्रे रेल्वे स्थानक परिसराला भेट दिली असता तेथील अस्वच्छता, रेल्वे रुळांलगत साचलेला कचरा, फलाटावरील घाण आणि लगतच्या झोपडपट्ट्यांची परिस्थिती यांचे चित्रीकरण केले. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होताच मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या आणि रेल्वे प्रशासनावर टीकेची झोड उठली.
या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने वांद्रे स्थानक परिसरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली. रेल्वे मार्गालगत लोखंडी कुंपण उभारण्याचे काम सुरू करण्यात आले असून स्थानिक रहिवाशांना रेल्वे रुळांमध्ये कचरा टाकू नये, याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, रेल्वे मार्गावरील कचरा हटविण्यासाठी अभियांत्रिकी विभागाकडून ‘मेक स्पेशल’ (कचरा उचलणारी विशेष रेल्वेगाडी) नियमितपणे वापरली जाते, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. स्थानक परिसरातील रेल्वेच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून त्यावरील निष्कासनाची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.
कायदेशीर अडचणी असूनही रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि संबंधित विभागांकडून नव्या अनधिकृत बांधकामांविरोधात नियमित पाडकाम मोहीम राबवली जात आहे. लगतच्या झोपडपट्ट्यांमधून रेल्वे रुळांमध्ये कचरा टाकला जात असल्याने समस्या निर्माण होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
नागरिकांकडून कचरा रेल्वे परिसरात टाकला जाऊ नये यासाठी महानगरपालिका आणि शहर पोलिसांशी समन्वय साधून उपाययोजना केल्या जात असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने सांगितले.


