नवी मुंबई प्रतिनिधी
होळीच्या उत्साहात रंगलेल्या शहरात मंगळवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. नवी मुंबईतील पाम बीच रोडवर भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेली तरुणी गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सुमारे तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. होळीच्या निमित्ताने शहरात वाहतूक तुलनेने कमी असताना संबंधित तरुण-तरुणी दुचाकीवरून जात होते. त्याच वेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेले. तरुण रस्त्याच्या मध्यभागी पडला असताना पाठीमागून आलेल्या कारच्या चाकाखाली तो चिरडला गेला. अपघात इतका भीषण होता की त्याचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणीला तातडीने डी वाय पाटील रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अपघातानंतर संबंधित कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. काही प्रत्यक्षदर्शींनी दोन वाहनांचा सहभाग असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, होळीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अचानक झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
याच पार्श्वभूमीवर, काही दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे येथे नवविवाहित तरुणाचा सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, सलग अपघातांच्या घटनांमुळे रस्ते सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन आणि वेगमर्यादेचे भान राखण्याची गरज अधोरेखित होत आहे.


