मुंबई प्रतिनिधी
मुंबई लोकलमधील महिलांच्या डब्यात बुरखा परिधान केलेल्या एका पुरुषाने प्रवेश केल्याचा दावा करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडीओमध्ये हा पुरुष महिलांच्या डब्यात संशयास्पद वर्तन करत असल्याचा आरोप करण्यात आला असून, यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
🚨 बुर्का बैन होना चाहिए : मुंबई घाटकोपर लोकल ट्रेन के महिला कोच में बुर्के में संधिग्ध चढ़ा
महिलाओं को गलत तरीके से छूने की कोशिश की इससे महिलाओं को उसके औरत होने पर शक हुआ
पकड़े जाने के डर से ट्रेन से कूदकर फरार हो गयाजिसका महिलाओं ने वीडियो रिकॉर्ड किया,
जिसके आधार पर… pic.twitter.com/3EU0YSB4Ym
— Ramesh Tiwari (@rameshofficial0) February 7, 2026
व्हायरल व्हिडीओनुसार, ही घटना घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात घडल्याचा दावा करण्यात येत आहे. बुरखा परिधान केलेल्या या व्यक्तीने महिलांच्या डब्यात प्रवेश करून काही महिलांना चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप व्हिडीओत करण्यात आला आहे. प्रवाशांना संशय आल्यानंतर महिलांनी त्याला जाब विचारला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने डब्यातून बाहेर पडत दुसऱ्या गाडीने पलायन केल्याचेही व्हिडीओत म्हटले आहे.
दरम्यान, रेल्वे पोलिसांकडे या घटनेबाबत तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा करण्यात येत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध घेतला जात असल्याचेही व्हिडीओमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणाबाबत रेल्वे पोलीस प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
महत्त्वाचे म्हणजे, हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असला तरी त्याची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या दाव्यांकडे सावधगिरीने पाहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मुंबई लोकल ही शहराची ‘लाईफलाईन’ म्हणून ओळखली जाते. दररोज लाखो महिला या लोकलमधून प्रवास करतात. मुंबई हे तुलनेने महिलांसाठी सुरक्षित शहर मानले जात असले, तरी अशा प्रकारच्या घटनांचे दावे समोर आल्याने महिला सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही महिलांच्या डब्यात पुरुषांनी प्रवेश केल्याच्या काही घटना समोर आल्या असून, त्यावरून सुरक्षाव्यवस्थेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या व्हायरल व्हिडीओबाबत प्रशासनाकडून अधिकृत खुलासा होतो का, तसेच संबंधित दावे खरे ठरतात का, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.


