
सांगली:प्रतिनिधी
स्वामित्व योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मिळकतीचे वर्षानुवर्षाचे वाद संपुष्टात येतील. नागरिकांचा वेळ, पैशांची बचत होईल, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी आज येथे केले.
स्वामित्व योजनेंतर्गत राष्ट्रीय कार्यक्रमात प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते 50 लाख मिळकत पत्रिकांचे आभासी वितरण करण्यात आले. या अनुषंगाने जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मंत्री श्री. गोरे बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, आमदार अरुण लाड, माजी पालकमंत्री व आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख एस. पी. सेठिया व्यासपीठावर उपस्थित होते.
स्वामित्व योजनेचे जनक महाराष्ट्र राज्य असल्याचा अभिमान असल्याचे सांगून मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, गावागावात मिळकतीचा नकाशा, हद्द, रस्ते याबाबतचे वाद बघायला मिळतात. मात्र स्वामित्व योजनेमुळे ही वर्षानुवर्षांची अडचण दूर होत आहे. गावाची अचूक मोजणी होत आहे. त्यामुळे गावठाणाचे वाद संपुष्टात येतील. गावांचे आर्थिक सक्षमीकरण होईल. न्यायालयात वर्षानुवर्षे सुरू असणारे वाद मिटतील. कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न मार्गी लागतील, असे ते म्हणाले.
प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते आज देशभरात क्रांतिकारी बदलाची सुरवात असल्याचे सांगून मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, स्वतःची मिळकत पत्रिका मिळाल्याने सामान्य माणसाला अनेक गोष्टी सुलभ होतील. बँकांकडून कर्जमंजुरी, आवास योजनेतून घर मिळून गरजूंना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या बैठकीत महाराष्ट्रात 20 लाख घरांचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आहे. स्वामित्व योजनेमुळे विविध घरकुल योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार असून, त्यामुळे एकही गरजू माणूस घरापासून वंचित राहणार नाही. ड्रोन मॅपिंग, हद्द निश्चिती, नकाशे संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सामान्य माणसाची अडचण संपणार आहे, असे ते म्हणाले.
यावेळी आमदार अरूण लाड यांनी मनोगत व्यक्त केले.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, जिल्ह्यातील 332 ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले असून, 1217 हेक्टर गावठाण जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड तयार झाले आहे. उर्वरित कामही चांगल्या पद्धतीने व वेळेत पूर्ण करण्याची ग्वाही देऊन त्यांनी या कामासाठी संबंधित विभागांचे अभिनंदन केले.