मुंबई प्रतिनिधी
जानेवारीचा अर्धा महिना उलटून गेला असला, तरी उत्तर भारतात अजूनही थंडीची लाट कायम आहे. आगामी काही दिवसांत हवामान प्रणालींमध्ये बदल होण्याची चिन्हे असून, त्याचा परिणाम देशभर जाणवण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. २३ जानेवारीच्या सुमारास हिमालयीन भागात मुसळधार पाऊस व बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात २२ ते २४ जानेवारीदरम्यान पावसाच्या सरी कोसळू शकतात.
महाराष्ट्रात पुढील चार दिवसांत तापमानवाढ
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे पुढील २४ तासांत किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. मात्र, त्यानंतरच्या चार दिवसांत राज्यातील किमान तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या जाणवणारा थंडीचा कडाका काहीसा कमी होईल आणि रात्रीचा गारवा ओसरण्याची चिन्हे आहेत.
राज्याच्या काही भागांत अंशत: ढगाळ वातावरण राहणार असून, दिवसाचे कमाल तापमान वाढल्याने उकाडा जाणवू शकतो. दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वाऱ्यांचा हंगाम संपुष्टात आल्याने हवामान कोरडे होत आहे. पहाटे व रात्री गारठा जाणवत असला, तरी दिवसा उष्णतेचा प्रभाव वाढणार आहे.
काही भागांत अजूनही थंडीचा प्रभाव
धुळे, निफाड आणि नांदेड या भागांत किमान तापमान अद्याप ८ ते ९ अंश सेल्सिअसदरम्यान आहे. कोकण पट्ट्यात मात्र थंडी हळूहळू कमी होऊ लागली आहे. दरम्यान, तामिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाल्याने अरबी समुद्राकडून खारे वारे वाहण्याची शक्यता असून, त्यामुळे काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकते. सध्या तरी राज्यात कुठेही मुसळधार पावसाचा अंदाज नाही, ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानली जात आहे.
जळगावात आठवड्याअखेर पुन्हा गारठा
जळगाव जिल्ह्यात सध्या थंडीचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी येत्या आठवड्याच्या अखेरीस पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. २० जानेवारीनंतर सक्रिय होणाऱ्या पश्चिमी विक्षोभामुळे २१ ते २६ जानेवारीदरम्यान शीतलहरींचा प्रभाव जाणवू शकतो. २३ ते २६ जानेवारीदरम्यान धुके व गारठा वाढण्याची, तर किमान तापमान १० अंशांखाली जाण्याची शक्यता आहे. दिवस मात्र तुलनेने उबदार राहतील. प्रजासत्ताक दिनाच्या आसपास थंडीची आणखी एक लाट येण्याचा अंदाज आहे.
धुळे, गोंदिया आणि निफाड सर्वाधिक थंड
राज्यात सध्या धुळे, गोंदिया आणि निफाड ही शहरे सर्वाधिक थंड नोंदवली गेली आहेत. पुढील २४ तास या भागांत गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, जानेवारी अखेरपर्यंत थंडी हळूहळू कमी होऊन त्यानंतर उकाडा वाढू शकतो, असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. रात्री थंडी आणि दिवसा उष्णता अशी दुहेरी स्थिती निर्माण होत असल्याने नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


