अकोला प्रतिनिधी
अकोला महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर जल्लोषाच्या वातावरणात अचानक उसळलेल्या हिंसाचाराने शहर हादरले. भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक शरद श्रीराम तुरकर यांच्यावर अकोट फाईल परिसरात शुक्रवारी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला. विजयानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीनंतर घडलेल्या या थरारक घटनेमुळे अकोल्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
महापालिकेच्या २० प्रभागांतील ८० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शहरातील अनेक प्रभागांत चुरशीची लढत पाहायला मिळाली. प्रभाग क्रमांक दोनमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात अटीतटीचा सामना रंगला. या प्रभागात तीन जागांवर एआयएमआयएमने बाजी मारली, तर एका जागेवर भाजपने काँग्रेसला धक्का दिला. प्रभाग क्रमांक दोन ‘ब’ मधून भाजपचे उमेदवार शरद तुरकर यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा तब्बल २२०० मतांनी पराभव केला. या विजयाने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता.
या उत्साहातूनच अकोट फाईल भागात विजयी रॅली काढण्यात आली. मात्र हा जल्लोष काही वेळातच रक्तरंजित वळणावर गेला. रॅली संपल्यानंतर अचानक काही अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी शरद तुरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.
हल्ल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त जमावाने अकोट फाईल भागात तोडफोड केली. उभ्या वाहनांचे नुकसान झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. घटनेची माहिती मिळताच अकोट फाईल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असली, तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, भाजपचे लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
निकाल जाहीर होताच शहरातील वातावरण तापले असताना, या हिंसक घटनेने लोकशाहीच्या उत्सवावर काळी छाया पडल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. अकोल्यात पुढील काही दिवस तणाव कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


