मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या सव्वादोन कोटी महिलांना डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यांचा मिळून प्रत्येकी ३ हजार रुपयांचा लाभ मकरसंक्रांतीपूर्वी वितरित करण्याचे नियोजन राज्य सरकारकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाने सुमारे ६,७०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही जुनी शासकीय योजना असल्याने, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहितेमुळे या योजनेच्या लाभवितरणास अडथळा येणार नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शासन निर्णयानुसार दरमहा १० तारखेपर्यंत लाभ वितरित करण्याची तरतूद असून, त्याच आधारे पुढील वितरण होणार आहे.
यापूर्वी महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असतानाही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. मात्र, मतदानापूर्वी होणाऱ्या लाभवितरणाबाबत काँग्रेस पक्षाने राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, यावर आयोग काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अनाथ तसेच एक पालक नसलेल्या मुलांसाठी राबविण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनेअंतर्गतही प्रलंबित लाभ वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत पात्र मुलांना १८ वर्षांपर्यंत दरमहा २,२५० रुपये दिले जातात. गेल्या दोन महिन्यांपासून हा लाभ रखडलेला असून, त्यासाठी महिला व बालविकास विभागाने वित्त विभागाकडे १०० कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर केली आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या एकूण २.२३ कोटी महिला लाभार्थी आहेत. यापैकी सुमारे ९३ लाख महिला शहरी भागातील असून, दीड कोटी लाभार्थी ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात सध्या कोणतीही आचारसंहिता लागू नसल्यामुळे, तसेच ही योजना जुनी असल्याने लाभवितरण थांबविता येणार नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.
लाडकी बहीण योजना : थोडक्यात
एकूण लाभार्थी : २.२३ कोटी
शहरी भागातील लाभार्थी : अंदाजे ९३ लाख
दोन महिन्यांसाठी अपेक्षित निधी : सुमारे ६,६९० कोटी रुपये
मकरसंक्रांतीपूर्वी निधी उपलब्ध झाल्यास लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.


