मुंबई प्रतिनिधी
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेमुळे निवडणूक यंत्रणा सतर्क झाली असून, मुंबईत निवडणूक भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. देवनार परिसरात दोन व्हॅनमधून तब्बल २ कोटी ३३ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी शहरात विविध ठिकाणी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. अशाच एका पथकाने देवनार भागात तपासणीदरम्यान दोन व्हॅन थांबवून झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली. संबंधितांकडून ही रक्कम एटीएममध्ये भरण्यासाठी नेली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, निवडणूक काळात इतक्या मोठ्या प्रमाणावर रोकड वाहतूक केल्याने संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणाची माहिती तातडीने आयकर विभागाला देण्यात आली असून पुढील चौकशी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सध्या ही रोकड देवनार पोलिसांच्या ताब्यात कस्टडी म्हणून ठेवण्यात आली आहे. ही रक्कम नेमकी कुठून आली, कुठे आणि कोणासाठी नेली जात होती, तसेच तिचा वापर कोणत्या उद्देशाने होणार होता, याचा तपशीलवार तपास सुरू आहे. देवनार पोलिसांनी या घटनेची नोंद स्टेशन डायरीत केली आहे.
दरम्यान, निवडणूक काळात बेकायदेशीररीत्या पैशांचा वापर होऊ नये, मतदारांना आमिष दाखवले जाऊ नये यासाठी मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये नाकाबंदी वाढवण्यात आली आहे. प्रमुख रस्ते, शहरांचे प्रवेशद्वार आणि संवेदनशील भागांमध्ये वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. संशयास्पद वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, नियमभंग आढळल्यास कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता राखण्यासाठी अशी कारवाई महत्त्वाची असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. आयकर विभागाच्या चौकशीनंतर या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


