मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील परळ परिसरात असलेल्या टाटा मेमोरियल रुग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने हालचाली करत रुग्णालयाचा संपूर्ण परिसर रिकामा केला असून सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
धमकीची माहिती मिळताच परळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ रुग्णालयाचा ताबा घेतला. बॉम्ब शोधक पथक, श्वानपथक तसेच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून रुग्णालयाच्या प्रत्येक मजल्यावर आणि परिसरातील कानाकोपऱ्यात सखोल तपासणी सुरू आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
टाटा मेमोरियल रुग्णालय हे देशातील कर्करोग उपचारांचे एक अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे केंद्र आहे. देशाच्या विविध भागांतून हजारो रुग्ण उपचारासाठी येथे येतात. त्यामुळे या धमकीमुळे रुग्णालयात तसेच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धमकी कुठून आली, कोणत्या माध्यमातून देण्यात आली आणि यामागे कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस आयुक्त स्वतः संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. प्राथमिक तपासानंतरही खबरदारी म्हणून रुग्णालय परिसरात कोणालाही प्रवेश देण्यात येत नाही.
विशेष म्हणजे, यापूर्वीही टाटा रुग्णालयाला अशाच प्रकारची बॉम्ब धमकी देण्यात आली होती. त्यामुळे ही अफवा आहे की प्रत्यक्ष घातपात घडवण्याचा प्रयत्न आहे, याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे.
दरम्यान, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांनी आणि परिसरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तपास पूर्ण होईपर्यंत सुरक्षा यंत्रणा पूर्णतः सतर्क ठेवण्यात आली आहे.


