सातारा प्रतिनिधी
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पुन्हा एकदा गालबोट लागले असून मराठी साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर संमेलनाच्या स्थळीच हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना घडली. या प्रकारामुळे साताऱ्यासह राज्यभरात खळबळ उडाली असून साहित्यिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
साहित्य संमेलन सुरू असतानाच काही अज्ञात व्यक्तींनी अचानकपणे कुलकर्णी यांच्याजवळ येत त्यांच्या चेहऱ्यावर काळा बुक्का टाकला. या घटनेमुळे संमेलनस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
या हल्ल्यानंतर विनोद कुलकर्णी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. “माझ्यावर हल्ला का झाला, याचे कारण मला माहीत नाही. माझे प्राण गेले तरी मला त्याची पर्वा नाही; मात्र मी माझे काम थांबवणार नाही. पोलिसांनी या हल्ल्यामागील आरोपींचा शोध घ्यावा,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
दरम्यान, हा प्रकार स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याची चर्चा असून याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही. हल्लेखोर नेमके कोण होते आणि हल्ल्यामागील कारण काय, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.
साहित्य संमेलनासारख्या विचारमंथनाच्या व संवादाच्या व्यासपीठावर अशा स्वरूपाची घटना घडल्याने अनेक साहित्यिकांनी चिंता व्यक्त केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि वैचारिक मतभेदांचा सन्मान राखला गेला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे आयोजकांसह प्रशासनासमोरही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


