मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षीच्या दहावी-बारावीच्या परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त राहाव्यात, यासाठी सर्वसमावेशक सुरक्षा आराखडा तयार केला आहे. परीक्षा केंद्राबाहेर पोलिस गस्त, केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच पर्यवेक्षकांच्या मोबाईल फोनचे झूम अॅपद्वारे थेट जिल्हा नियंत्रण कक्षाशी जोडले जाणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली.
सध्या परीक्षा केंद्र निश्चितीची प्रक्रिया सुरू असून, गेल्या वर्षीचीच केंद्र संख्या कायम ठेवण्यात आली आहे. प्रत्येक केंद्राची गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली असून, ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नसतील तेथे तातडीने बसवण्याचे आदेश दिले आहेत. तुटलेल्या सुरक्षा भिंती व पायाभूत सुविधांची दुरुस्तीही करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांची ओळख टाळण्यासाठी यंदा ‘मिश्र आसन व्यवस्थे’ची अंमलबजावणी होणार आहे. विविध शाळांतील विद्यार्थी एकाच केंद्रावर बसवले जातील, तर पर्यवेक्षकांचीही जिल्हानिहाय अदलाबदल केली जाईल. प्रत्येक परीक्षा केंद्रावरील हालचालींचा व्हिडिओ प्रवाह थेट जिल्हा दंडाधिकारी व शिक्षण अधिकाऱ्यांकडे उपलब्ध राहील.
कॉपीमुक्त मोहिमेला बळ देण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयातील विशेष पथक परीक्षा काळात तैनात राहील. आवश्यकतेनुसार केंद्रांवर पाहणी-छापे करण्यात येतील. यासोबतच शिक्षण विभाग, महसूल विभाग व मंडळ अधिकाऱ्यांची पथकेही कर्तव्यावर असतील.
बारावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा २३
जानेवारीपासून, तर लेखी परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होतील. दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारीपासून, तर प्रात्यक्षिक परीक्षा २ फेब्रुवारीपासून होणार आहेत. परीक्षा जवळ आल्यानं शाळांमध्ये अभ्यासक्रम पूर्णत्वास जात असून, शिक्षकांसह विद्यार्थीही अंतिम तयारीत व्यस्त आहेत.


