कणकवली, सिंधुदुर्ग प्रतिनिधी
कणकवली नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे मंत्री नितेश राणे यांना अनपेक्षित धक्का बसला असून, शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी झाले आहेत. या निकालामुळे कणकवलीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीत कणकवलीत भाजप विरुद्ध सर्वपक्षीय अशी थेट लढत रंगली होती. स्थानिक पातळीवर शिवसेनेचे दोन्ही गट एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट, यांचीही अप्रत्यक्ष युती पाहायला मिळाली. त्यातूनच ‘शहर विकास आघाडी’चा प्रयोग पुढे आला आणि त्याने नगराध्यक्षपदावर यश मिळवले. विशेष म्हणजे, नगराध्यक्षपद शहर विकास आघाडीने जिंकले असले तरी नगरपरिषदेच्या १५ पैकी ८ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे सत्तेचे गणित आणि नगराध्यक्षपद यामध्ये स्पष्ट फरक निर्माण झाला आहे.
विजयानंतर माध्यमांशी बोलताना संदेश पारकर यांनी सांगितले की, “शहर विकास आघाडीमध्ये सर्व पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र आले. आमदार निलेश राणे, उदय सामंत, वैभव नाईक, सतीश सावंत, राजन तेली यांच्यासह सर्वसामान्य कणकवलीकरांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्यामुळेच हा विजय शक्य झाला.”
“कणकवलीसाठी शाश्वत विकासाचा पाया घालण्याचा आम्ही निर्धार केला आहे. या लढतीदरम्यान आम्हाला विविध आमिषे आणि प्रलोभने देण्यात आली; मात्र कणकवलीकरांच्या सन्मानाची लढाई आम्ही तडजोड न करता लढलो. ही लढाई अखेरीस जनतेने जिंकून दाखवली,” असे त्यांनी नमूद केले.
उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना पारकर म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी मला थेट विरोध केला नव्हता. पक्ष म्हणून एक भूमिका असावी, एवढेच त्यांनी सांगितले होते. शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एक ‘कणकवली पॅटर्न’ पुढे आला आहे. भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवलीचा नारा आम्ही दिला होता, आणि जनतेने त्यावर विश्वास दाखवला.”
या निकालामुळे कणकवलीत स्थानिक स्वाभिमान, विकास आणि राजकीय एकत्रिकरण यांचे नवे सूत्र पुढे आले असल्याचे चित्र आहे. आगामी काळात नगरपरिषदेतील सत्तासंतुलन आणि शहर विकास आघाडीची भूमिका कशी राहते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


