संभाजीनगर प्रतिनिधी
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच, त्याच धर्तीची आणखी एक धक्कादायक घटना संभाजीनगर जिल्ह्यात घडली आहे. शहरालगतच्या ओहर–जटवाडा गावात जमिनीच्या वादातून माजी सरपंच दादा सांडू पठाण (वय ६८) यांची ११ जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड व लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून हत्या केली. या हल्ल्यात तिघे जखमी झाले असून, घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. जमिनीच्या वादातून आरोपींचे टोळके आधी दादा पठाण यांच्या घरावर चालून गेले. त्यानंतर झालेल्या हाणामारीत पठाण यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर संतप्त जमावाने आरोपींच्या दुकानांची तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हर्सूल पोलीस ठाणे व गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गावात दंगा काबू पथक तैनात करण्यात आले आहे.
या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, इम्रान मोईन पठाण व उमेर जमीर पठाण या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक स्वाती केदार यांनी दिली. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
मृत दादा पठाण यांचा मुलगा आसिफ पठाण (३३) यांनी फिर्याद दिली आहे. ओहर गावातील गट क्रमांक १९८ मधील साडेचार एकर जमिनीच्या मालकी हक्कावरून दोन कुटुंबांत २०२२ पासून वाद सुरू आहे. या जमिनीचा कायदेशीर ताबा दादा पठाण यांच्याकडे असून महसूल दप्तरी तशा नोंदी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, आरोपी या जमिनीवरून सातत्याने वाद घालत होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील या जागेवरूनच हा संघर्ष उफाळून आला, असे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिसांकडून कडक कारवाईची मागणी होत आहे.


