सावंतवाडी प्रतिनिधी
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवासाठी ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी नगरपरिषदेत यंदाच्या निवडणुकीत रंगत वाढवणारी मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. भाजपने नगराध्यक्ष पदासाठी राजघराण्याच्या सौ. श्रद्धा सावंत भोसले यांना अधिकृत उमेदवारी देत निवडणूक समीकरणांमध्ये मोठा बदल घडवून आणला आहे. भोसले यांनी सोमवारी तीन नामनिर्देशनपत्रे दाखल करून आपली उमेदवारी अधिकृत केली.
पक्षात या पदासाठी अन्य अनेक इच्छुकांची नावं चर्चेत होती. मात्र सर्वांना मागे टाकत भाजपने राजघराण्यातील उमेदवारावर अंतिम शिक्कामोर्तब केले. त्यामुळे सावंतवाडीच्या राजकारणात सध्या या निर्णयाची जोरदार चर्चा रंगत आहे.
राजकीय वारशाची ताकद
श्रद्धा सावंत भोसले यांचा राजकीय वारसा दांडगा आहे. त्या सावंतवाडी संस्थानचे शेवटचे राजे आणि माजी आमदार कै. श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या नातसून आहेत. तर त्यांचे पती लखम सावंत भोसले हे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून सक्रिय आहेत. स्थानिक राजकारणात भोसले घराण्याचा प्रभाव कायम असून, त्याचा लाभ निवडणुकीत भाजपला मिळू शकेल, अशी चर्चा आहे.
बड्या नेत्यांची शिफारस ठरली निर्णायक
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि विधानसभा सभापती अॅड. राहुल नार्वेकर यांची सौ. भोसले यांच्या उमेदवारीसाठी विशेष शिफारस असल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते. दोन वरिष्ठ नेत्यांचा ठाम पाठिंबा मिळाल्यानेच त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जात आहे.
ऐतिहासिक लढतीची संकेत
राजघराण्यातील उमेदवाराला नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरवण्याचा भाजपचा निर्णय हा सावंतवाडी नगरपरिषदेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. स्थानिक मुद्दे, राजकीय वारसा आणि पक्षांतरांचा प्रभाव अशा अनेक समीकरणांमुळे ही निवडणूक अधिकच लक्षवेधी ठरणार आहे.
सावंतवाडीतील राजकीय तापमान आधीच वाढले असून, आगामी दिवसांत ही लढत अधिकच रंगत जाण्याची चिन्हे आहेत.


