पुणे प्रतिनिधी
पुणे | परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि बिघडवतही नाही, माणूसच परिस्थिती घडवतो,” या वाक्याचा अर्थ जगाला दाखवून दिला आहे पुण्यातील लोहगाव परिसरातील 17 वर्षीय सनी फुलमाळीने. झोपडीत राहणारा, तालीम नसतानाही कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर आशियाई पातळीवर सुवर्णपदक जिंकणारा हा तरुण आज प्रेरणेचं प्रतीक ठरला आहे.
सनीने अलीकडेच बहरीनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय युथ कुस्ती स्पर्धेत 60 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत भारताचा झेंडा उंचावला. आर्थिक अडचणी, साधनसामग्रीचा अभाव आणि कठीण परिस्थिती असूनही सनीने कधी हार मानली नाही. दिवस-रात्र सराव करत, स्वतःच्या जिद्दीवर त्याने जगाला आपली ताकद दाखवून दिली.
विशेष म्हणजे, सनीचे वडील नंदीबैल घेऊन दारोदारी भविष्य सांगतात. हातावर पोट असलेल्या या कुटुंबाने परिस्थितीला शरण न जाता तीनही मुलांना पैलवान बनवलं आहे. या मेहनती वडिलांनी दाखवून दिलं की जिद्द आणि संस्कार यांच्या जोरावर स्वप्नं पूर्ण करता येतात.
आज Asia Gold Medal Winner Sunny Fulmali हे नाव महाराष्ट्राचं आणि भारताचं अभिमानाने उच्चारलं जात आहे.


