म्हसवड प्रतिनिधी
माण तालुक्यातील पुळकोटी येथे दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या वृद्धेच्या खुनाचा अखेर उलगडा झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या अथक प्रयत्नांनंतर जयसिंह उर्फ करण आप्पासो लोखंडे (वय २३, रा. शिरताव, ता. माण) या आरोपीस अटक करण्यात आली आहे.
घटना अशी:
१२ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास पुळकोटी गावात ६५ वर्षीय सुलभा मारुती गलंडे या महिला घरी एकट्या असताना अज्ञाताने त्यांचा खून करून पुरावे नष्ट केले होते. म्हसवड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा अत्यंत गुंतागुंतीचा असल्याने आरोपीपर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी आव्हान ठरले होते.
तपासात मिळाला निर्णायक धागा
गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी रणजित सावंत (दहिवडी विभाग) व पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
पथकाने गावात आणि परिसरात गुप्त बातमीदारांचे जाळे उभारून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. दरम्यान, शिरताव गावातील एक युवक गुन्हा घडल्यापासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यावरून पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकाने त्या युवकाचा शोध घेतला. चौकशीत सहा तासांच्या चौकशीनंतर आरोपीने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
हुडीवरील टॅगलाइन ठरली ‘क्लू’!
तपासादरम्यान आरोपीच्या वापरातील हुडीवर “When granted everything, you can’t do anything” ही टॅगलाईन लिहिलेली असल्याचे लक्षात आले. या छोट्याशा धाग्यानेच पोलिसांना तपासाची दिशा मिळाली आणि अखेर खुनाचा गुन्हा उघडकीस आला.
तपास पथकाचे कौतुक
या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सपोनि रोहित फाणे, पोउनि विश्वास शिंगाडे, परितोष दातिर, म्हसवड पोलीस स्टेशनचे सपोनि अक्षय सोनवणे, पोउनि अनिल वाघमोडे, तसेच दहिवडी पोलिसांचे सपोनि दत्तात्रय दराडे आणि त्यांच्या टीमने परिश्रम घेतले.
गुन्हा उघडकीस आणणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी अभिनंदन केले आहे.


