सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्याने स्वच्छतेच्या क्षेत्रात सन २००१ पासून घेतलेल्या झपाट्याने प्रगतीचा आता इतर राज्यांकडूनही अभ्यास होत आहे. उघड्यावर शौचमुक्ती उपक्रम यशस्वी ठरून ग्रामीण भागात घराघरात शौचालयांची बांधणी व वापर सुरू झाल्याने आरोग्य निर्देशांकात लक्षणीय सुधारणा झाली आहे. याच स्वच्छता मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी राजस्थान राज्यातील अधिकाऱ्यांचे पथक साताऱ्यात दाखल झाले.
खंडाळा तालुक्यातील विंग व शिरवळ ग्रामपंचायतींनी उभारलेल्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांची पाहणी या पथकाने केली. या प्रकल्पांमुळे गावातील सांडपाणी प्रक्रिया करून त्याचा उपयोग उद्यान व हरितक्षेत्रात केला जात असल्याचे पथकाने प्रत्यक्ष पाहिले.
अलवर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव साळुंखे (आयएएस) यांच्या नेतृत्वाखालील या पथकात भरतपूर व गंगानगर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. सातारा जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पथकाचे स्वागत केले. यावेळी जिल्ह्यात राबविल्या जात असलेल्या स्वच्छता मोहिमा व विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
प्रकल्प पाहणीदरम्यान सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, महिला बचत गट सदस्य, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. गावोगाव असे प्रकल्प उभारले तर स्वच्छतेच्या दिशेने ग्रामीण भागात मोठी क्रांती होईल, असे गौरव साळुंखे यांनी नमूद केले.
यानंतर पथकाने महाबळेश्वर तालुक्यातील गुरेघर व क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतींना भेट देऊन स्वच्छता उपक्रमांचे अवलोकन केले.
जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने-भोसले, मुख्य लेखा वित्त अधिकारी राहुल कदम, समाज कल्याण अधिकारी विद्याधर चल्लवर यांसह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात राबविल्या जात असलेल्या ठोस व द्रव कचरा व्यवस्थापन उपक्रमांचे कौतुक करत, हे मॉडेल इतर जिल्ह्यांसाठी पथदर्शी ठरेल, असा विश्वास राजस्थान पथकाने व्यक्त केला.


