
सातारा प्रतिनिधी
प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करून इतिहास घडवला. या ऐतिहासिक प्रसंगाचे शिल्प उभारण्याची शिवप्रेमींची अनेक वर्षांची मागणी आता गतीमान होण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या दालनात प्रतापगड प्राधिकरण समितीची बैठक पार पडली. या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे पालकमंत्री शंभूराज देसाई, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन तसेच पुरातत्त्व विभाग, वन विभाग व प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. हिंदू एकता आंदोलन समितीचे शिष्टमंडळही यावेळी उपस्थित होते.
गत २४ वर्षांपासून शिल्प स्थापनेचा पाठपुरावा करणारे नितीन शिंदे यांनी शासनाकडून होत असलेल्या विलंबावर नाराजी व्यक्त केली. २७ नोव्हेंबरपर्यंत शिल्प उभारणीचा निर्णय झाला नाही, तर प्रतिशिल्प घेऊन प्रतापगड पायथ्याशी बसवण्याचा इशाराही त्यांनी पुन्हा दिला. त्यानंतर उदयनराजेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांची तातडीने भेट निश्चित करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीत प्रतापगड विकासासाठी मंजूर असलेल्या १२७ कोटींच्या कामांचा आढावा घेण्यात आला. किल्ल्याचे जतन-संवर्धन, पार्किंगची सोय, विद्युत सुविधा, तसेच आवश्यकतेनुसार जमीन वर्गीकरण याबाबत निर्णय घेण्यात आले. प्रतापगड परिसरातील वनराईचे संरक्षण व आवश्यक त्या ठिकाणी पुनर्वनीकरण करण्याबाबतही चर्चा झाली.
किल्ल्यावर जाण्यासाठी वृद्ध व लहान मुलांना अडचणींचा सामना करावा लागतो, त्या पार्श्वभूमीवर रोपवे व फर्निक्युलर यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे उदयनराजेंनी नमूद केले. “विकासकामांसाठी आवश्यकता भासल्यास देवस्थानाची जमीनही उपलब्ध करून दिली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रतापगडाचा ऐतिहासिक वारसा जतन करताना सुविधांचा विकास आणि शिवप्रेमींच्या भावनांचा आदर राखत पुढील निर्णय घेतले जातील, अशी हमी उदयनराजेंनी यावेळी दिली.


