 
                
सातारा प्रतिनिधी
केरा व मणदुरे परिसरातील दीर्घ प्रतीक्षेत असलेल्या उपसा सिंचन योजनेला आता वेग येणार आहे. या भागातील सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनसुविधा देण्यासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले असून, सर्वेक्षण पूर्ण होताच आराखडा तयार करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
केरा व मणदुरे विभागातील निवकणे, चिटेघर व बिबी लघुप्रकल्पाच्या दोन्ही तीरावरील गावांना धरणातील तसेच केरळा नदीच्या पात्रातील पाणी १०० मीटर उंचीपर्यंत उचलून देण्याच्या उपसा सिंचन सर्वेक्षणाचे उद्घाटन पाटण तालुक्यात करण्यात आले. यावेळी दादासाहेब जाधव, दादासाहेब पाटील, भरत पाटील, अभिजीत पाटील, एन. डी. पाटील यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
“या भागातील नागरिक पिढ्यान्पिढ्या पाण्यापासून वंचित राहिले. त्यांचे स्वप्न आता साकार होणार आहे. तारळी पॅटर्ननुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी पुरवठा केला जाईल,” असे श्री. देसाई म्हणाले. या प्रकल्पामुळे शेतीक्षेत्राचा कायापालट होण्याबरोबरच पिकांची पद्धत बदलण्यासही मदत होईल. शिवाय रोजगारासाठी होणारे स्थलांतरही थांबण्यास हातभार लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या योजनेंतर्गत होणारे सर्वेक्षण वेळेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी स्थानिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. देसाई यांनी केले.
या कार्यक्रमाला परिसरातील ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली. सरकारच्या या उपक्रमामुळे कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांच्या शेतीला प्रत्यक्ष पाण्याचा आधार मिळणार असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

 
 
 

